शेतकऱ्यांची मागणी : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेवर्धा : सर्वत्र दुष्काळ सदृश्य स्थिती असून शासनही मदतीवर विचार करीत आहे़ असे असताना स्टेट बँक आॅफ इंडियाद्वारे शेतकऱ्यांना थकित कर्ज वसुलीसाठी नोटीसी बजावल्या आहेत़ यामुळे त्रस्त देवळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात निदर्शने करीत न्यायाची मागणी केली़ देवळी तालुक्यातील सुमारे ७०० शेतकऱ्यांना स्टेट बँक शाखेने मागील थकित कर्जाच्या वसुलीसाठी नोटीस बजावल्या़ यात मूळ रक्कम व तितकेच व्याज आकारून १३ डिसेंबर रोजी तालुका विधीसेवा प्राधिकरण येथे हजर राहण्यास बजावण्यात आले़ यानुसार शेतकऱ्यांनी हजेरी लावली; पण येथे न्याय मिळण्याची शक्यता कमीच दिसून आली़ देवळी तालुका व परिसरात गत तीन वर्षांपासून नापिकीचे सावट आहे. यंदाही ५० टक्क्यांच्या आत आणेवारी आहे़ असे असताना बँकेने कर्जाचा तगादा लावला आहे. देवळीच्या बँकेने ७०० च्या वर नोटीस दिल्या आहेत़ यामुळे पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या़ जिल्हाधिकारी एऩ नवीन सोना यांनी याकडे त्वरित लक्ष देत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली़ शेतकऱ्यांच्या कर्जावरील संपूर्ण व्याज माफ करावे, मूळ रकमेचे किस्ती पाडून देण्यात याव्या, अशी मागणी अब्दुल जब्बार, संजय देशमुख, महादेव तेलरांधे, वसंत राऊत, मारोती रूद्रकार, जीवन मेंघरे, राहुल उगेमुगे, विठ्ठल तेलरांधे, गणपत पोटे, देवदत्त डफरे, गणेश महल्ले आदी शेतकऱ्यांनी केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
कृषी कर्ज वसुली स्थगित करा
By admin | Updated: December 13, 2014 22:45 IST