सकारात्मक मानसिकता हीच काळाची गरज
By Admin | Updated: February 2, 2016 01:53 IST2016-02-02T01:53:30+5:302016-02-02T01:53:30+5:30
समाजातील मानसिक समस्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सकारात्मक मानसिकता काळाची गरज ठरत आहे.

सकारात्मक मानसिकता हीच काळाची गरज
सी.जी. पांडे : मानसशास्त्र विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा
वर्धा : समाजातील मानसिक समस्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता सकारात्मक मानसिकता काळाची गरज ठरत आहे. सामान्य माणसांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आत्मविश्वासाने वावरता यावे म्हणून प्रत्येक व्यक्तीने सकारात्मक विचार आपल्या मनात रुजवावे. म्हणजे त्यातून उद्भवणाऱ्या सकारात्मक भावनांमुळे जीवनातील अस्वस्थता कमी करता येईल, असे विचार मुंबई विद्यापीठाचे मानसशास्त्र विभागाचे माजी प्रमुख डॉ. सी.जी. पांडे यांनी व्यक्त केले.
‘सकारात्मक मानसशास्त्रीय भांडवल आणि स्वस्थ जीवन’ या विषयावरील यशवंत महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विलास देशमुख होते तर प्रमुख अतिथी म्हणून अमेटी विद्यापीठ राजस्थान, जयपूर येथील डॉ.एस.एस. नथावत, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ. कें. पी. निंबाळकर उपस्थित होते.
सकारात्मक मानसशास्त्रावर कार्य करणाऱ्या संशोधकांच्या संशोधनाचा फायदा मानसशास्त्र अभ्यासणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व्हावा. त्यावरील आवश्यक मानसशास्त्रीय परिक्षणे नव्याने होणाऱ्या संशोधनाकरिता उपलब्ध व्हावीत याकरिता कार्यशाळा उपयुक्त ठरेल असे मत डॉ. निंबाळकर यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले.
कार्यशाळेत राज्यातील विविध महाविद्यालयातील मानसशास्त्र विषयात आचार्य पदवी प्राप्त प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यानंतर बोलताना प्रा. डॉ. नथावत यांनी जीवन जगताना कोणतेही दडपण ठेऊ नये. आशावादी दृष्टीने जगावे. डॉ. नथावत यांनी कार्यशाळेतील दोन सत्रात सकारात्मक मानसशास्त्रावरील विविध परीक्षणे सोडवायला देऊन त्याआधारे प्रत्येकांच्या सकारात्मक क्षमतांचे मापन व विश्लेषण केले.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात ‘ताण व हृदयविकार’ या विषयावर बोलताना डॉ. देशपांडे म्हणाले, जीवनात ताण हा राहणारच. ताण पूर्वीही होता आजही आहे आणि ताण हा आवश्यक आहे. ताणाला सहजतेने सामोरे जा, म्हणजे ताणाचा प्रभाव जाणवणार नाही.
सकारात्मक मानसिकतेचे समाजाचे स्वास्थ राखण्यात मोठे योगदान आहे. त्याआधारे समाजाचे मानसिक स्वास्थ्य जपले जाते. म्हणून नकारात्मक विचारांना सकारात्मक बाजूने बदलविण्याचे कसब अंगी बाळगले तर ते समाजाच्या मानसिक स्वास्थ्यास पोषक असेल, असे मत प्राचार्य देशमुख यांनी व्यक्त केले. डॉ. पुरुषोत्तम बोरकर व रुपाली सरोदे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यशाळेला नागपूर, औरंगाबाद, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आदी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अतुल सिदूरकर यांनी तर आभार प्रा. अरुणा हरले यांनी मानले. डॉ. ढोणे, डॉ. धोटे, प्रा. खान, प्रा. बेले, प्रा. खोब्रागडे, प्रा. कवाडे, प्रा. पाटील, नांदुरकर आदींनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)