कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला ट्र्कने चिरडले; समुद्रपूर तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2022 05:37 PM2022-11-11T17:37:23+5:302022-11-11T17:39:05+5:30

परिसरात हळहळ

Policeman on duty crushed by truck; Incidents in Samudrapur Taluka | कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला ट्र्कने चिरडले; समुद्रपूर तालुक्यातील घटना

कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला ट्र्कने चिरडले; समुद्रपूर तालुक्यातील घटना

Next

समुद्रपूर तालुक्यातील नागपूर- हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील खंडाळा शिवारात जामच्या महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करीत होते. या दरम्यान तपासणी सुरू असलेल्या उभ्या टिप्परला मागाहून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली. यात ट्रक पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर गेल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी सातच्या सुमारास घडली.

गौरव खरवडे असे मृत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते जामच्या महामार्ग पोलीस मदत केंद्रामध्ये कार्यरत होते. पोलीस उपनिरीक्षक देवेंद्र पटले यांच्या मार्गदर्शनात १० पोलीस कर्मचारी सकाळी महामार्गावर नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी टिप्पर क्रमांक केए ३७ ए ८५७६ ला पोलीस कर्मचारी गौरव खरवडे यांनी थांबवून कागदपत्राची तपासणी सुरू केली. या दरम्यान मागाहून भरधाव आलेल्या एमएच ३४ एबी ०७२५ क्रमांकाच्या ट्रकने टिप्परला धडक दिली. 

या धडकेत टिप्पर खरवडे यांच्या अंगावर जाऊन दुभाजकावर चढला. यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी एमएच ३४ एबी ०७२५ क्रमांकाच्या ट्रकचा चालक सुनील ढोणे (रा. हिंगणघाट) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार प्रशांत काळे, उपनिरीक्षक राम खोत व पोलीस कर्मचारी करीत आहेत. 

घटनास्थळी महामार्ग पोलीस अधीक्षक श्वेता खेडेकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम, महामार्ग प्रभारी सपाटे, स्नेहल राऊत यांनी भेट दिली. गौरव खरवडे हे उत्साही कर्मचारी म्हणून पोलीस विभागात ओळखले जात होते. त्यांच्या अशा या अपघाती मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Policeman on duty crushed by truck; Incidents in Samudrapur Taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.