पोलीस शिपायाने पादचाऱ्यास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 05:00 IST2021-01-02T05:00:00+5:302021-01-02T05:00:12+5:30
अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अभिजित हेमंत सबाणे (३५), रा. सर्कस मैदान, रामनगर, वर्धा यांच्या तक्रारीवरून आरोपी कारचालक सचिन दीक्षित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.

पोलीस शिपायाने पादचाऱ्यास चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहर पोलीस ठाणे येथे पोलीस शिपाई असलेल्या सचिन दुर्गाप्रसाद दीक्षित (वय ३०), रा. रामनगर याने आपल्या ताब्यातील कार निष्काळजीपणे चालवून ‘मॉर्निंग वॉक’साठी घराबाहेर पडलेल्या पादचाऱ्यास धडक दिली. यात पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास बॅचलर रोडवरील शिववैभव मंगल कार्यालयासमोर घडली. रौनक सुबोध सबाणे (३५), रा. सबाने लेआऊट, असे मृताचे नाव आहे.
शुक्रवारी पहाटे रौनक सुबोध सबाणे हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. ते पायी-पायी बॅचलर रोडवरील शिववैभव मंगल कार्यालयाजवळ असले असता भरधाव असलेल्या एमएच ०६ बीई ४७११ क्रमांकाच्या कारने त्यांना धडक दिली. अपघात होताच वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी खांबावर चढले.
अपघाताची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. या प्रकरणी अभिजित हेमंत सबाणे (३५), रा. सर्कस मैदान, रामनगर, वर्धा यांच्या तक्रारीवरून आरोपी कारचालक सचिन दीक्षित याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पुढील तपास रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनाजी जळक यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक पोलीस निरीक्षक पुंडलिक गावडे करीत आहेत.
घटनास्थळी जमली होती बघ्यांची एकच गर्दी
बॅचलर रोडवर झालेल्या अपघाताची वार्ता वर्धा शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी झाली होती. पोलिसांनी नागरिकांची गर्दी बाजूला सारून सुरूवातीला पंचनामा केला. त्यानंतर अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये नेली. अपघातग्रस्त वाहन आरोपीच्याच मालकीचे की दुसऱ्या कुणाच्या मालकीचे यासह विविध बाबांचा उलगडा पोलीस तपासात होणार आहे.