Police raid Sarpanch's house | सरपंचाच्या घराची पोलिसांकडून झडती

सरपंचाच्या घराची पोलिसांकडून झडती

ठळक मुद्देराजकीय क्षेत्रात खळबळ। पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी

लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : कापसी वाळू घाटावर वाढत्या वाळू तस्करीबाबत सरपंच नितीन चंदनखेडे यांनी सहायक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी यांच्या लक्षात आणून देत त्यांची समजूत घातली होती. त्याचा राग मनात धरून गणेश बैरागी यांनी सुडबुद्धीने नितीन चंदनखेडे यांच्या घरी १२ गृहरक्षक घेऊन छापा मारला आणि सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीविना घराची झडती घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून सरपंच नितीन चंदनखेडे यांनी याप्रकरणी गणेश बैरागी यांच्या विरुद्ध अल्लीपूर ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी आणि वाळू चोरट्यांमध्ये आर्थिक देवाण घेवाण सुरू आहे. रात्रीच्या सुमारास वाळू भरलेले ट्रक आणि टिप्पर सोडणे सुरू आहे. वर्धा-यवतमाळ सिमेवरून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती काही नागरिकांनी सरपंच नितीन चंदनखेडे यांना दिली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या अनुषंगाने चंदनखेडे कापसी चौकीवर गेले आणि गणेश बैरागी यांच्याशी चर्चा केली. वाळू तस्करी होत असेल तर त्यामुळे गावात कोरोनाचा शिरकाव होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी बैरागी यांना सांगितले. पण, बैरागी यांच्या दादागिरीपुढे सरपंच नितीन चंदनखेडे यांचे एक चालले नाही. गुरुवारी दुपारच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी १२ गृहरक्षकांना घेऊन सरपंच चंदनखेडे यांच्या घरी आले आणि पत्नी पुनम चंदनखेडे यांना शिवीगाळ केली. चंदनखेडे यांनी पोलिसांना घरी का आले अशी विचारणा केली असता तुझ्या घराची झडती घ्यायची असल्याचे सांगितले. वाळू तस्करीबाबत शासनाचा महसूल बुडत असून त्यांना कारवाई करण्यास सांगितल्यामुळेच बैरागी यांनी विनापरवानगी घर झडती घेतली असून घरातील साहित्याची फेकाफेक केली. त्यामुळे माझे कुटुंब दहशतीच्या सावटाखाली असून गावात बदनामी झाल्याने गणेश बैरागी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रार चंदनखेडे यांनी अल्लीपूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकांना दिली आहे. तसेच तक्रारीच्या प्रती मानवाधिकार आयोग मुंबई, गृहमंत्रालय, पोलीस महासंचालक, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक वर्धा आणि जिल्हाधिकारी यांनापाठविल्या आहेत. यासंदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी यांच्याशी संपर्क केला असता त्यांचा भ्रमणध्वनी नॉट रिचेबल होता.

तब्बल एक तास तपासणी पण पंचनामा नाही
सरपंच चंदनखेडे यांच्या घरी पोलिसांनी विनापरवानगी छापा मारून तब्बल एक तास घराची झडती घेत चौकशी केली. पण, कोणत्याहीप्रकारचा पंचनामा केला नाही. तसेच पंचनाम्यावर स्वाक्षरीही घेतली नाही. त्यामुळे ही झडती कशी आणि याला परवानगी कुणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे..
मास्क लावण्याचा विसर
सरपंच नितीन चंदनखेडे यांच्या घराची झडती घेण्यास गेलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १२ गृहरक्षकांना मास्क लावण्याचा विसर पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तोंडाला मास्क लावणे आवश्यक असताना कायद्याच्या रक्षकांकडूनच त्याचे उल्लंघन होत असेल तर कारवाई कोण करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाळू तस्करांसोबत ‘अर्थकारण’
सहाय्यक पोलीस निरीक्षक बैरागी हे अर्थकारणामुळे वाळू तस्करांना मुभा देतात. त्यांची वाळू भरलेली वाहने सोडून देतात. ही बाब लक्षात आल्यावर त्यांच्या विचारणा केली असता त्यांनी सरपंच चंदनखेडे यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत सुडबुद्धीने घराची झडती घेतल्याचा आरोप त्यांनी तक्रारीतून केला आहे.

यासंदर्भात मला वरिष्ठांनी सांगितले होते. त्यांच्या सांगण्यानुसारच सरपंच चंदनखेडे यांच्या घराची झडती घेण्यात आली आहे.
-योगेश कामाले, पोलीस निरीक्षक, अल्लीपूर

Web Title: Police raid Sarpanch's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.