जुनी पेन्शन योजना : ४६१ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सांभाळला 'आरोग्य'चा डोलारा
By महेश सायखेडे | Updated: March 14, 2023 16:37 IST2023-03-14T16:37:20+5:302023-03-14T16:37:47+5:30
८६७ कर्मचाऱ्यांनी नोंदविला बेमुदत संपात सक्रिय सहभाग

जुनी पेन्शन योजना : ४६१ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी सांभाळला 'आरोग्य'चा डोलारा
वर्धा : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या संपात मंगळवारी आरोग्य विभागाचे तब्बल ८६७ कर्मचारी सहभागी झाले होते. तर ५८ कर्मचारी पूर्व परवानगीने रजेवर होते. असे असले तरी कार्यरत ४६१ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सेवा देत आरोग्य विभागाचा डोलारा सांभाळला.
जिल्ह्यातील वर्धेचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आर्वी आणि हिंगणघाट येथे उपजिल्हा रुग्णालय तसेच आठ ग्रामीण रुग्णालय असे एकूण अकरा रुग्णालय जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिकार क्षेत्रात येतात. तर ग्रामीण भागातील ३१ प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच उपकेंद्र ही जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात येतात. मंगळवारी जिल्ह्यातील याच शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह ४६१ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा असे म्हणत प्रत्यक्ष सेवा देत आरोग्य यंत्रणेचा डोलारा सांभाळला.
आरोग्य यंत्रणेतील मनुष्यबळाची मंगळवारची स्थिती
* सीएस कार्यक्षेत्र
कार्यरत : १६३
संपात सहभागी : ३९८
पूर्व परवानगीने रजेवर : २७
* डीएचओ कार्यक्षेत्र
कार्यरत : २९८
संपात सहभागी : ४६९
पूर्व परवानगीने रजेवर : ३१