चाकूच्या धाकावर वृद्ध दाम्पत्याला लुटले
By Admin | Updated: August 5, 2015 02:14 IST2015-08-05T02:14:44+5:302015-08-05T02:14:44+5:30
मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरलेल्या चार अज्ञात इसमांनी चाकूच्या धाकावर वृद्ध दाम्पत्याला लुटले.

चाकूच्या धाकावर वृद्ध दाम्पत्याला लुटले
आरोपी चार : पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास
वर्धा : मध्यरात्रीच्या सुमारास घरात शिरलेल्या चार अज्ञात इसमांनी चाकूच्या धाकावर वृद्ध दाम्पत्याला लुटले. यात सोन्याचे दागिने व रोख हजार रुपये, असा एकूण २ लाख ७६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना आर्वी तालुक्यातील बारेगाव (हातला, पुनर्वसन) येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून मंगळवारी सकाळी उघड झाली. या प्रकरणी आर्वी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव (हातला) (पु.) येथील विश्वास शिरपूरकर (८०) हे त्यांच्या कुटुंबीयांसह गाढ झोपेत असताना त्यांच्या घराच्या मागील दारातून चार अज्ञात इसम आत शिरले. शिरपूरकर यांना काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने त्यांना जाग आल्याने या चार अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांना गप्प बसण्यास सांगितले.
या चोरट्यांनी शिरपूरकर दाम्पत्याला धमकावणी करून घरातील दागिने, पैसे व मुल्यवान वस्तूंबाबत विचारणा केली. शिरपूरकर यांनी जीवाच्या भीतीने त्यांना सर्वच माहिती दिली. या चोरट्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी कपाटातील सोन्याच्या पाटल्या (सात तोळे), पोथ (एक तोळा), बांगड्या (तीन तोळे) असे दागिने तर रोख एक हजार रुपये घेवून चोरट्यांनी पळ काढला.
हा सर्व प्रकार मंगळवारी मध्यरात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास घडला. याप्रकाराने शिरपूरकर दाम्पत्य घाबरले होते. सकाळ झाल्यावर या चोरीची तक्रार आर्वी पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तक्रारीवरून चार अज्ञात इसमावर कलम ३९२, ४५८ अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेचा तपास आर्वी पोलीस करीत आहे. या प्रकरणी तपास सुरू असून पोलिसांच्या हाती अद्याप कुठलाही सुगावा लागला नाही. या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण आहे.(स्थानिक प्रतिनिधी)