तलाठ्याला कार्यालयाचे वावडे
By Admin | Updated: September 13, 2014 02:10 IST2014-09-13T02:10:23+5:302014-09-13T02:10:23+5:30
येथील तलाठी गत एक महिन्यापासून स्थानिक कार्यालयात सापडत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

तलाठ्याला कार्यालयाचे वावडे
रोहणा : येथील तलाठी गत एक महिन्यापासून स्थानिक कार्यालयात सापडत नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. शासनाच्या विविध शेती विषयक योजनांसाठी आवश्यक असलेले सात-बारा, व नकाशे शेतकऱ्यांना मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, जेव्हा जावे तेव्हा ग्राम सचिवालयातील तलाठी कार्यालयाला कुलूप लागून राहत असल्याने तलाठ्याकडून मिळणारे दाखले शेतकऱ्यांना वेळेवर मिळत नाही. पूर्वी रोहणा येथील तलाठी आठवड्यात दोन-तीन दिवस कार्यालयात भेटायचे. निदान आठवड्यातील बाजाराच्या दिवशी मंगळवारला हमखास कार्यालयात भेटायचे. त्यामुळे शेतकऱ्यांना सात बारा, आठ अ व शेताचा नकाशा यासारखे दाखले स्थानिक पातळीवर आठवडाभऱ्यात मिळत होते. पण जमीन खरडून गेल्याच्या नुकसान भरपाईत तलाठी कार्यालयाकडून झालेला घोटाळा उघड झाल्यापासून सदर तलाठी कार्यालयात आलेच नाही. परिणामी एक महिन्यापासून सदर कार्यालयाला कुलूप राहते. ते कधी उघडले तर तिथे पटवारी नसून कोतवाल हजर असतो. तो केवळ पटवारीसाहेब आले नाही एवढेच उत्तर देतो. परिणामी शेतकऱ्यांना आवश्यक दाखले वेळेवर मिळत नाही. काही शेतकरी आर्वीला जाऊन दाखले मिळवितात. एकंदरीत आवश्यक दाखल्यासाठी शेतकऱ्यांना भटकंती करावी लागते. रोहणा येथील तलाठ्याप्रमाणे आठवड्यातील दोन-तीन दिवस तरी कार्यालयात बसावे अशी मागणी रोहण्यातील शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)