ओसाड व भग्न धर्मशाळेवर व्यावसायिकांचा ताबा
By Admin | Updated: June 23, 2017 01:32 IST2017-06-23T01:32:06+5:302017-06-23T01:32:06+5:30
धार्मिक भावनेतून शहरात येणाऱ्या भाविकांना जागा उपलब्ध व्हावी म्हणून मुख्य मार्गावर शतकीय उंबरठा

ओसाड व भग्न धर्मशाळेवर व्यावसायिकांचा ताबा
धर्मशाळा पालिकेला हस्तांतरित करा : मुख्यमंत्र्यांना निवेदनातून साकडे
प्रभाकर शहाकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
पुलगाव : धार्मिक भावनेतून शहरात येणाऱ्या भाविकांना जागा उपलब्ध व्हावी म्हणून मुख्य मार्गावर शतकीय उंबरठा ओलांडणारी धर्मशाळा बांधली गेली. सध्या यावर काही व्यावसायिकांनी ताबा मिळविला आहे. धर्मशाळाही भग्न झाली आहे. ही जागा शासनाच्या महसूल विभागाच्या अधिकारात आहे. शहर विकासाच्या दृष्टीने ही धर्मशाळा पालिकेला हस्तांतरीत करावी, अशी मागणी न.प. प्रशासनाने केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदनातून साकडे घालण्यात आले आहे.
शहरालगत वाहणाऱ्या वर्धा नदीच्या काठावर भोसलेकालीन शिव मंदिर, जवळच श्री कोटेश्वर देवस्थान, आर्वी नजिक प्रसिद्ध क्षेत्र कौंडण्यपूर, सोमवती अमावस्येला वर्धा नदीकाठी भरणाऱ्या यात्रेसाठी भाविक येत होते. त्यांची सोय व्हावी म्हणून आर्वी तालुक्यातील वाठोडा येथील स्व. मेघराज जयनारायण डागा या परिवाराने शतकापूर्वी धर्मशाळा बांधली. शहराच्या मुख्य मार्गावर मौजा पुलगाव ब्लॉक क्र. ८ भुखंड क्र. १३ क्षेत्रफळ १७ हजार ५७६ चौ. फुट असणारी ही धर्मशाळा त्या काळात चुना, रेती व विटांनी बांधलेली आहे. सोमवती अमावस्या महाशिवरात्री पुरूषोत्ताम मासानिमित्त बाहेरून येणारे भाविक या धर्मशाळेतील खोल्यांचा वापर करीत होते. दळणवळणाची फारशी साधने उपलब्ध नसल्याने भाविकांना मुक्कामी राहावे लागत होते; पण अत्याधुनिक काळात या धर्मशाळेकडे दुर्लक्ष होत गेल्याने येथे काही समाजसेवी मंडळींनी लिबर्टी क्लब, लिबर्टी वाचनालय, उत्कर्ष मंडळासाठी या धर्मशाळेच्या समोरील भागाचा वापर सुरू केला.
धर्मशाळेच्या काही खोल्यांचा व्यावसायिक वापर होत होता. यानंतर पुढे या धर्मशाळेचा अनेक प्रकारच्या चांगल्या-वाईट कृत्यासाठी होऊ लागला. परिणामी, काही काळ या धर्मशाळेचा वाद न्यायप्रविष्ठ होता. यानंतर ही वास्तू महसूल विभागाच्या अधिपत्यात देण्यात आली. या धर्मशाळेत काही काळ नायब तहसीलदार कार्यालय थाटून महसूल विभागाचा कारभार चालविण्यात आला; पण जीर्ण धर्मशाळेचा नायब तहसीलदार कार्यालय भागाचा स्लॅब कोसळला. यामुळे कार्यालय हलविण्यात आले. शहराच्या मुख्य व मध्य भागात असणाऱ्या या धर्मशाळेत मोठे व्यापार संकूल वा भाजी बाजार सुरू केल्यास नागरिकांच्या सोयीसह पालिकेला चांगली आवक होऊ शकते. उत्पन्नात वाढ होऊ शकते. या भावनेतून नवनिर्वाचित नगरसेविका तथा आरोग्य व स्वच्छता सभापती ममता बडगे यांनी पालिका प्रशासनाला तर भाजपा जिल्हा चिटणीस नितीन बडगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आर्वी येथे भेट घेत ही धर्मशाळा पालिकेला व्यापारी संकुलासाठी हस्तांतरित करण्याची मागणी केली. नगराध्यक्ष शीतल संजय गाते यांनीही १७ फेब्रुवारीच्या सभेत ठराव पारित करून ही जागा व्यापारी संकुलासाठी न.प. ला देण्याची मागणी केली.
मुख्याधिकाऱ्यांनीही केला पत्रव्यवहारातून पाठपुरावा
तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी पत्र क्र. १३७८/२०१७ दि. ४ मे २०१७ अन्वये जिल्हाधिकारी वर्धा यांना धर्मशाळेची जागा नगर परिषदेला हस्तांतरीत करण्याची विनंती केली.
पालिकेच्या या मागणीकडे राज्य व जिल्हा प्रशासनाने लक्ष दिल्यास नगर परिषदेला उत्पन्नाचे साधन मिळेल. धर्मशाळा मिळाल्यास भाजी बाजार वा व्यापार संकुलासाठी या जागेचा वापर होऊन सुशिक्षीत बेरोजगारांना रोजगार मिळू शकणार आहे.