पोषण आहार साहित्य तपासणीचे आदेश
By Admin | Updated: August 8, 2015 02:16 IST2015-08-08T02:16:31+5:302015-08-08T02:16:31+5:30
शालेय पोषण आहाराची कधी नव्हे ती आता तपासणी होणार असल्याचे संकेत मिळत आहे. याकरिता प्रत्येक ...

पोषण आहार साहित्य तपासणीचे आदेश
वर्धेत अनभिज्ञता : प्रत्येक शाळेतून नमुने घेण्याचे शिक्षण संचालकांचे पत्र
रूपेश खैरी वर्धा
शालेय पोषण आहाराची कधी नव्हे ती आता तपासणी होणार असल्याचे संकेत मिळत आहे. याकरिता प्रत्येक शाळेतील पोषण आहाराकरिता असलेल्या साहित्याचे नमुने घेण्याच्या सूचना राज्याच्या शिक्षण संचालकांनी नुकत्याच दिल्या आहेत. सर्व नमूने शुक्रवारी (दि.७ आॅगस्ट) या एकाच दिवसात घेत त्याची माहिती संचालकांना देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वर्धेत शिक्षण संचालकांच्या या आदेशाची माहितीच नसल्याचे समोर आले. लोकमत कार्यालयातून माहिती देण्यात आल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर आदेशाबाबत माहिती मिळाल्याने येथे शाळेतील पोषण आहाराचे नमुने किती गांभीर्याने घेतले असतील याचा विचार न केलेलाच बरा.
जि.प.च्या शाळांसह पोषण आहाराचा लाभ घेणाऱ्या जिल्ह्यात ११०० च्यावर शाळा आहेत. या शाळेत येणाऱ्या पोषण आहाराच्या साहित्याची कधीच तपासणी करण्यात आली नाही. यात अचानक गुरुवारी शिक्षण उपसंचालकांचे पत्र प्रत्येक जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात धडकले. तसेच पत्र वर्धेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयात धडकले. या आदेशानुसार शाळेत पुरविण्यात येणार असलेल्या प्रत्येक साहित्याचे नमुने घेण्याच्या सूचना आहेत. हे नमूने घेवून त्याचे काय करावे याकरिता मात्र शिक्षणाधिकाऱ्यांना पुढील आदेशाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे आदेशात नमुद आहे.
तांदूळ, दाळीसह तेल व कांद्याचेही घेणार नमुने
शालेय पोषण आहाराकरिता शाळेत पोहोचलेल्या सर्वच साहित्याचे नमूने घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. यात तांदूळ, सर्व डाळी, सर्व कडधान्य प्रत्येकी १०० ग्रॅम, तेल, कांदा, लसून, हळद पावडर, मसाला, मीठ, जीरे आदी साहित्याचे नमूने घेण्याच्या सूचना आदेशात आहेत. सर्व नमूने एकाच दिवशी घ्यावे असेही आदेशात नमूद आहे.
पोषण आहाराचे नमूने घेताना त्याचा पंचनामा करण्यात यावा. पंचनामा करताना गावचा सरपंच, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, पालक प्रतिनिधी किंवा गावातील लोकांची यावेळी उपस्थिती राहणे आवश्यक आहे. शिवाय पंचनामा करताना फोटो काढण्याच्या सूचनाही या आदेशात आहेत.
केलेले पंचनामे सील करून पुढील आदेशापर्यंत जतन करून ठेवण्याचे या आदेशात नमुद आहे. अधिकाऱ्यांनी घेतलेले नमूने त्यांनी त्यांच्या कार्यालयात तर शाळेत शिक्षकांनी घेतलेले नमुने त्यांच्या शाळेत सुरक्षित ठेवावे. या नमुन्यासंदर्भात पुढील आदेश आल्यानंतर यावर काय कार्यवाही करावी या संदर्भात सूचना करण्यात येणार आहे. शिवाय या संदर्भातील अहवाल सायंकाळपर्यंत शिक्षण उपसंचालकांना पाठविण्याचेही आदेशीत आहेत.
शिक्षण संचालकांच्या पत्राची वर्धेच्या शिक्षण विभागाला सकाळी माहिती नव्हती. दुपारी या पत्राची माहिती मिळाल्यानंतर शिक्षण विभाग कामाला लागल्याने पत्रानुसार सायंकाळी अहवाल गेला अथवा नाही याबाबत साशंकता आहे.
‘लोकमत’मुळे मिळाली शिक्षण विभागाला माहिती
शिक्षण संचालकांच्या या पत्राची माहिती जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी व शिक्षण सभापतींना नसल्याचे दिसून आले. या संदर्भात माहिती घेण्याकरिता त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतरच त्यांना याची माहिती मिळाली. ‘लोकमत’मधून दूरध्वनी गेल्यानंतर त्यांनी ‘ई मेल’ची पाहणी केली असता या पत्राची माहिती मिळाली. माहिती मिळताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधत पत्राची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. यानुसार जिल्ह्यात नमूने घेण्याचे काम सुरू झाल्याची माहिती शिक्षण विभागातील सुत्रांनी दिली. यामुळे वर्धेच्या नमुन्यांबाबत संशय आहे.