आता गावातच कळणार शेतकऱ्यांना मातीची क्षमता
By Admin | Updated: September 30, 2016 02:30 IST2016-09-30T02:30:27+5:302016-09-30T02:30:27+5:30
कोणत्या जमिनीमध्ये कोणते पीक घेता येईल याचेही परीक्षण करता येते, हे पूर्वी शेतकऱ्यांच्या ध्यानीमनी नव्हते.

आता गावातच कळणार शेतकऱ्यांना मातीची क्षमता
रोजगाराची संधी : ३२ विद्यार्थी झाले माती परीक्षक
वर्धा : कोणत्या जमिनीमध्ये कोणते पीक घेता येईल याचेही परीक्षण करता येते, हे पूर्वी शेतकऱ्यांच्या ध्यानीमनी नव्हते. जमिनीचा पोत, नत्र, स्पूरद या बाबी दूर होत्या. शेतकऱ्यांना काय पेरायचे व काय नाही, हे कळत नव्हते असे नव्हे; पण आता नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. नैसर्गिक आपत्ती व शासनाचे उदासिन धोरण यात शेती करणे जिकरीचे झाले आहे. यामुळेच आता खबरदारी घेऊन शेती करण्याची पद्धत विकसित झाली. यात ‘माती परीक्षण’ हा विषय महत्त्वपूर्ण ठरत आहे. देवळी तालुक्यातील ३२ विद्यार्थ्यांनी तत्सम प्रशिक्षण घेतल्याने आता शेतकऱ्यांना गावातच ही सुविधा उपलब्ध होणार आहे.
शेतकऱ्यांना मातीचे परीक्षण करायचे झाल्यास कृषी विभागावर अवलंबून राहावे लागत होते. खासगीरित्या मातीचे परीक्षण करायचे म्हटले तर पैसे मोजावे लागत होते. शिवाय जिल्हा वा तालुकास्थळी येण्या-जाण्याचा खर्चही करावा लागत होता. कृषी विभागाची वर्धा येथे प्रयोगशाळा आहे. या ठिकाणी कृषी विभागाकडून घेण्यात आलेले वा शेतकऱ्यांनी स्वत: आणून दिलेल्या मातीच्या नमूण्यांचे परीक्षण केले जाते. शिवाय त्यांच्या जमिनीमध्ये कोणते पीक घेणे योग्य राहिल, खते कशी वापरावी, फवारणी कोणती करावी आदी मार्गदर्शनही केले जाते. या बाबी आता गावातच शक्य होत असून अल्प मोबदल्यात शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
देवळी तालुक्यातील ३२ गावांतील शेतकरी पाल्यांनी पाच दिवसीय माती परीक्षणाचे प्रशिक्षण घेऊन माती परीक्षक झाले आहेत. हे प्रशिक्षण या मुलांना युवा संस्था देवळीमार्फत कृषी समृद्धी प्रकल्पाच्या माध्यमातून देण्यात आले. संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे प्लॉस्टी सर्च इंडस्ट्रीज, भूमी प्रयोगशाळा यांनी या युवकांना प्रशिक्षित केले. हे युवक अॅग्रीकल्चर डिप्लोमा धारक आहेत. या प्रशिक्षणामुळे ३२ गावांतील शेतकऱ्यांच्या शेतातील मातीची त्यांच्याच गावात तपासणी करता येणार आहे. प्रत्येक हंगामापूर्वी मातीचे परीक्षण करणे योग्य असते. यासाठी वर्धा गाठणे वा कृषी विभागावर अवलंबून राहणे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. गावातच मातीचे परीक्षण करता येणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळून उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत.(कार्यालय प्रतिनिधी)