सत्याग्रही घाटात रात्रीचा थरार; चालकाची हत्या करून ट्रक नेला चोरून, परिसरात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2022 22:09 IST2022-10-08T22:09:11+5:302022-10-08T22:09:49+5:30
एम.एच. ४० एन. ३२१० क्रमांकाचा ट्रक घेऊन चक्रधरसिंग हा नागपूर येथून अकोल्यासाठी लोखंडी पाइपचा माल भरून घेऊन जात होता. शुक्रवारी ७ रोजी दुपारी मृ़तक चक्रधरसिंग हा एकटाच निघाला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो ट्रकमध्ये पाइपचा माल भरून अकोला येथे जाण्यासाठी निघाला. मात्र, दोघांनी धारदार शस्त्राने चक्रधरसिंगच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या करून लोखंडी पाइप भरून असलेला ट्रक चोरून नेला.

सत्याग्रही घाटात रात्रीचा थरार; चालकाची हत्या करून ट्रक नेला चोरून, परिसरात खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव (श्या.पंत.) : लोखंडी पाइप घेऊन अकोल्याकडे जात असलेल्या ट्रकचालकाची निर्घृणपणे हत्या करून अख्खा ट्रकच चोरून नेला. ही घटना तळेगाव येथील सत्याग्रही घाटात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी ८ रोजी तळेगाव पोलिसांनी एका आरोपीस नागपूर जिल्ह्यातून अटक केल्याची माहिती दिली.
चक्रधरसिंग रामसजीवनसिंग असे मृत चालकाचे नाव आहे. तर पोलिसांनी सुनील गामा भारव्दाज, रा. वलनी खदान, सावनेर, जि. नागपूर याला अटक केली असून विकास उर्फ ईसरार शेख, ह. मु. कारंजा (घा) याचा शोध सुरू आहे. पोलीस सूत्रांनुसार, नागपूर येथील जसविंदरसिंग हरिसिंग सैनी व जसवीरसिंग सासन हे दोघे मित्र मिळून सासन ट्रान्सपोर्ट चालवतात. त्यांचा एम.एच. ४० एन. ३२१० क्रमांकाचा ट्रक घेऊन चक्रधरसिंग हा नागपूर येथून अकोल्यासाठी लोखंडी पाइपचा माल भरून घेऊन जात होता. शुक्रवारी ७ रोजी दुपारी मृ़तक चक्रधरसिंग हा एकटाच निघाला होता. रात्री ९.३० वाजताच्या सुमारास तो ट्रकमध्ये पाइपचा माल भरून अकोला येथे जाण्यासाठी निघाला. मात्र, दोघांनी धारदार शस्त्राने चक्रधरसिंगच्या डोक्यावर प्रहार करून त्याची हत्या करून लोखंडी पाइप भरून असलेला ट्रक चोरून नेला.
ट्रकमालकाला पारशिवनी पोलीस ठाण्यातून फोन आला आणि लोखंडी पाइप भरून असलेला ट्रक उभा असल्याचे सांगितले. ट्रकमालक जसविंदरसिंग सासन हे पारशिवनी ठाण्यात गेले असता सुनील गामा भारव्दाज आणि विकास उर्फ ईसरार शेख यांनी ट्रक चोरून आणत सदर माल पारशिवनी परीसरात विक्री करताना पोलिसांची चाहूल लागल्याने ते पळून गेल्याची माहिती दिली. काही वेळाने पारशिवनी पोलिसांना तळेगाव पोलिसांचा फोन आला असता इंदरमारी परिसरात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. त्यांनी पाठविलेल्या फोटोतून मृतक चक्रधरसिंग असल्याचे समजले. तळेगाव पोलिसांनी याप्रकरणी एकास अटक केली असून, दुसऱ्या आरोपीचा शोध घेत असल्याची माहिती दिली.