रामनगर व सावंगी येथे होणार नवीन पोलीस ठाणे
By Admin | Updated: July 7, 2014 23:42 IST2014-07-07T23:42:54+5:302014-07-07T23:42:54+5:30
शहराचा वाढता आकार व गुन्ह्यांचा वाढता आलेख पाहता पोलिसांना त्यावर आळा घालण्यास अपयश येत आहे. यावर मार्ग काढत शासनाद्वारे वर्धा शहर व सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामनगर

रामनगर व सावंगी येथे होणार नवीन पोलीस ठाणे
वर्धा : शहराचा वाढता आकार व गुन्ह्यांचा वाढता आलेख पाहता पोलिसांना त्यावर आळा घालण्यास अपयश येत आहे. यावर मार्ग काढत शासनाद्वारे वर्धा शहर व सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामनगर व सावंगी (मेघे) येथे पोलीस ठाणे देण्याचा निर्णय घेतला आहे. हे पोलीस ठाणे येत्या स्वातंत्र्यदिनी सुरू होणार असल्याचे पोलीस विभागाद्वारे सांगण्यात आले़
रामनगर व सावंगी (मेघे) येथे देण्यात येत असलेल्या पोलीस ठाण्यांकरिता पोलीस विभागाद्वारे जागा शोधण्यात येत आहे. जागा शोधण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. जागा उपलब्ध होताच बांधकाम सुरू करण्यात येणार आहे़ नव्याने तयार करण्यात येत असलेले पोलीस ठाणे सुरू करण्याची कुठलीही तारीख शासनाच्यावतीने देण्यात आली नाही. असे असताना जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने १५ आॅगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असल्याचे पोलीस विभागाने सांगितले़
रामनगर येथे तयार होणार असलेल्या पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक देण्यात येणार आहे. या ठाण्यांतर्गत रामनगर व आसपासचा परिसर तसेच आर्वी नाका व आसपासचा परिसर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. सावंगी (मेघे) येथे तयार होत असलेल्या पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक देण्यात येणार आहे. या पोलीस ठाण्यांतर्गत सेवाग्राम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावंगी परिसरातील काही भाग येणार आहे. हे दोन पोलीस ठाणे तयार झाल्यानंतर त्या परिसरात होणाऱ्या गुन्ह्यांवर आळा बसणार असल्याच्या प्रतिक्रिया पोलीस विभागाद्वारे देण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)