भाच्याने केला आत्यावर जीवघेणा हल्ला, स्टीलच्या गडव्याने फोडले डोके
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 17:06 IST2021-11-18T16:57:51+5:302021-11-18T17:06:32+5:30
किरकोळ कारणातून झालेल्या भांडणात भाच्याने रागात आत्याला धारदार स्टीलच्या गडव्याने डोक्यावर जबर वार करीत जखमी केले.

भाच्याने केला आत्यावर जीवघेणा हल्ला, स्टीलच्या गडव्याने फोडले डोके
वर्धा : सख्ख्या आत्याच्या डोक्यावर भाच्याने स्टीलच्या धारदार गडव्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना हिंदनगर परिसरात घडली. जखमी महिलेवर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली.
माधुरी विलास महाशब्धे असे जखमी महिलेचे नाव आहे. माधुरी घरी असताना भाचा सूरज लिमळे (रा. गजानन नगर) हा आला. दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले असता सूरज लिमळे याने घरातीलच धारदार स्टीलच्या गडव्याने माधुरीच्या डोक्यावर जबर वार करीत जखमी केले.
याची माहिती माधुरीच्या मुलीचा मुलगा ओमकार देशकर याला कळाली. त्याने तत्काळ घराकडे धाव घेतली असता घरासमोर नागरिकांची गर्दी जमलेली होती. त्याने घरात पाहिले असता स्वयंपाकखोलीत रक्ताचा सडा पडला होता. जमलेल्या नागरिकांनी जखमी माधुरीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने सेवाग्राम येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.
या प्रकरणी ओमकार देशकर यांच्या तक्रारीवरून सूरज लिमळे याच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कलमान्वये रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलिसांनी दिली. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक संजय मिश्रा करीत आहेत.