मानवी अस्तित्वासाठी मधमाशा संवर्धनाची नितांत गरज
By Admin | Updated: December 8, 2015 02:56 IST2015-12-08T02:56:42+5:302015-12-08T02:56:42+5:30
केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे.

मानवी अस्तित्वासाठी मधमाशा संवर्धनाची नितांत गरज
वर्धा : केवळ मध मिळते म्हणून नव्हे तर मानवी अस्तित्वाकरिता मधमाश्यांचे संवर्धन आणि संगोपन करणे गरजेचे आहे. याकरीता मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती व्हायला पाहिजे, असे मत सेंटर फॉर बी डेव्हलपमेन्टचे संचालक डॉ. गोपाल पालिवाल यांनी व्यक्त केले. खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर कार्यालय आणि ग्रामविकास तंत्र निकेतन, पिपरी यांच्यावतीने मधमाशी पालनावर आयोजित जाणीव जागृती कार्यशाळेत ते बोलत होते.
याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोग, नागपूर कार्यालयाचे सहाय्यक विकास अधिकारी सुरेश गुढे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. स्वयंरोजगाराकरिता खादी ग्रामोद्योग आयोगाच्या योजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यानंतर डॉ. पालिवाल यांनी मधमाश्यांचा जीवनक्रम, वैशिष्ट्ये, परागकण आणि मकरंदसाठी उपयुक्त पिके, फळ-झाडे, वनस्पती याबाबत पावर पार्इंट सादरीकरणातून सविस्तर माहिती दिली. मधमाश्यांना न जाळता अहिंसक पध्दतीने मध संकलन करण्यासाठी आवश्यक गणवेश, संकलनाची पध्दती प्रात्यक्षिकातून सांगितली. शिवारात आढळणारी गावरान माशी आणि सातपुडी माशीच्या मोहोळातून मध कसे काढता येते याचेही प्रात्यक्षिक त्यांनी दिले. सातपुडी माशी पेटीत कशी ठेवावी यावर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे स्वागत भाषण संस्थेचे प्राचार्य मोहन शिरभाते यांनी केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अधिष्ठाता अतुल शर्मा यांनी केले. कृषीसाठी आवश्यक घटक म्हणून मधमाश्यांचा समावेश करावा अशी मागणी त्यांनी केली. कार्यशाळेचे संचालन समन्वयक आशिष चौहान यांनी केले.
कार्यशाळेला जिल्ह्यातील २५ गावातील १० संस्थेतून ९८ महिला व पुरुष सहभागी झाले होते. कार्यशाळेला राजेंद्र खर्चे, वासुदेव खाडे, आरती, नीलेश आंबोरे, नागोराव नेहारे, सुनील पराये यांनी सहकार्य केले.(स्थानिक प्रतिनिधी)
परागीकरणाची प्रक्रिया
४निसर्गामधील सपुष्प वनस्पतीच्या परागीकरणाचे ८० टक्के काम मधमाशा करतात. भाजी, फळे, तेलबियाणे, डाळवर्गीय पिकांसह जंगलातील वृक्ष, वनस्पती, गवत यांच्याही परागीकरणाचे कार्य मधमाश्या करतात.
४परागीकरण वेळेवर आणि नीट झाले नाही तर बी-फळ लागण्याची शक्यताच संंपते. त्यामुळे त्या वनस्पतींचा पुढे प्रसार होत नाही. ती वनस्पती नष्ट होण्याचा धोका असतो. जैवविविधता टिकविण्यासाठी परागीकरणासारखी महत्त्वाची नैसर्गिक प्रक्रिया खंडित होऊअ नये याकरिता मधमाश्यांचे संवर्धन व्हायला हवे, असे मत तज्ज्ञांनी सांगितले.