मुस्लीम बांधव करणार क्षमायाचना
By Admin | Updated: June 22, 2017 00:32 IST2017-06-22T00:32:00+5:302017-06-22T00:32:00+5:30
रमजान महिन्यातील २६ वा रोजा गुरूवारी आहे. हा रोजा रमजान महिन्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो.

मुस्लीम बांधव करणार क्षमायाचना
आज शब-ए-कद्र : उद्या रमजानचा अंतिम शुक्रवार
मोईन शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
आंजी (मोठी) : रमजान महिन्यातील २६ वा रोजा गुरूवारी आहे. हा रोजा रमजान महिन्यातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी कुराण अवतरले होते, म्हणून रात्रीला शब-ए-कद्र म्हणतात. या रात्री जागून मुस्लीम बांधव इबादत करीत क्षमा मागतात व भविष्यासाठी दुआ करतात. २३ रोजी रमजान महिन्यातील शेवटचा शुक्रवार असल्याने सामूहिक नमाजमध्ये अलविदा रमजानचा संदेश देतात.
ईस्लाम धर्मातील महत्त्वाचा व इबादतचा महिना म्हणजे रमजान होय. या महिन्यात ईस्लाम धर्मीय महिनाभर अन्न, पाण्याचा त्याग करून सुर्योदय ते सूर्यास्तापर्यंत रोजा करतात. सोबतच मशीदमध्ये पाच वेळेची नमाज अदा करतात. या महिन्याची विशेष नमाज १३ व्या रात्री अदा होते. नमाजाला ईस्लाम धर्मीय आवर्जून हजर राहतात. रमजान महिन्याचे तीन पर्व असतात. पहिले १० दिवस रहमत, दुसरे १० दिवस बरकत तर तिसरे १० दिवस मगफिरतचे असतात. नकळत झालेल्या चुकांची क्षमा मागण्याचा हा महिना आहे. या महिन्यात प्रत्येक चांगल्या कृत्याला ७० टक्के पुण्य मिळते. या महिन्यात वार्षिक उत्पन्नातून २.५ टक्के हे जकात म्हणून गरीब, गरजू लोकांना दान करण्याचा नियम आहे. गरिबांचीही ईद साजरी व्हावी, हा उद्देश आहे. २९ वा ३० दिवसांचे रोजे होताच चंद्रदर्शनानंतर दुसऱ्या दिवशी इदगाहमध्ये एकत्र येत ईदची सामूहिक नमाज अदा केली जाते. तत्पूर्वी प्रत्येक स्त्री, पुरुष, बालक, वृद्धामागे २.४५ किलो गहू फितरा म्हणून गरिबाला दान करण्याचा नियम आहे. यामुळे या ईदला ऊल-फित्र म्हणतात. हा महिना आत्मनियंत्रण, त्याग, संयम, मदत, सामाजिक सद्भावना, बंधुप्रेमाची शिकवण देतो.