बहीण-भावाच्या मृत्यूमुळे आदर्शनगरात शोककळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 05:00 IST2019-10-29T05:00:00+5:302019-10-29T05:00:33+5:30
प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम येथील आदर्शनगर भागातील रहिवासी असलेला अविनाश गोंडगे व अविनाशची बहीण अनुष्का गोंडगे हे दोघे शेळ्या चारण्यासाठी आदर्शनगरच्या शेजारी असलेल्या अण्णासागर तलाव परिसरात गेले होते. शेळ्या चरण्यासाठी सोडल्यानंतर अनुष्का व अविनाश हे दोघेही तलावाच्या काठावर खेळत असतांना अचानक अविनाशचा तोल जाऊन तो तलावात पडला. अविनाश पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच अनुष्काने आरडा-ओरड करीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

बहीण-भावाच्या मृत्यूमुळे आदर्शनगरात शोककळा
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील वर्धा मार्गावरील अण्णासागर तलाव परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा तलावात बुडून मृत्यू झाला. सदर दोन्ही मृतक आदर्शनगर येथील रहिवासी असून या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. अविनाश राजेंद्र गोंडगे (१३) व अनुष्का राजेंद्र गोंडगे (१२) दोन्ही रा. आदर्शनगर सेवाग्राम, अशी मृतांची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, सेवाग्राम येथील आदर्शनगर भागातील रहिवासी असलेला अविनाश गोंडगे व अविनाशची बहीण अनुष्का गोंडगे हे दोघे शेळ्या चारण्यासाठी आदर्शनगरच्या शेजारी असलेल्या अण्णासागर तलाव परिसरात गेले होते. शेळ्या चरण्यासाठी सोडल्यानंतर अनुष्का व अविनाश हे दोघेही तलावाच्या काठावर खेळत असतांना अचानक अविनाशचा तोल जाऊन तो तलावात पडला. अविनाश पाण्यात बुडत असल्याचे लक्षात येताच अनुष्काने आरडा-ओरड करीत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.
अशात तीही तलावात पडली. दरम्यान, घटनास्थळी पोहोचलेल्या काही नागरिकांनी अनुष्काला तलावाबाहेर काढले. गंभीर प्रकृती असलेल्या अनुष्काला तातडीने सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस स्टेशनचे ठाणेदार कांचन पांडे, एएसआय प्रमोद बोंडसे, मनोज नेपटे, सुधीर लडके, अमोल जिंदे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पोहण्यात तरबेज असलेल्या व्यक्तींच्या सहकार्याने अविनाशचा मृतदेह तलावाबाहेर काढला.
पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेवाग्राम येथील रुग्णालयात पाठविला. घटनेची सेवाग्राम पोलिसांनी नोंद घेतली आहे. अगदी दिवाळीच्या सणादरम्यान ही घटना घडल्याने आदर्शनगरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळी आढळली सायकल
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी परिसराची बारकाईने पाहणी केली असता तलावाच्या काठावर एक छोटी सायकल आढळून आली. ती पोलिसांनी ताब्यात घेतली असून ही सायकल अविनाशने तेथे आणली असावी, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविला जात आहे. पुढील तपास सुरू आहे.