मध्यरात्री ‘सायरन’ वाजल्याने धावपळ

By Admin | Updated: August 8, 2015 02:21 IST2015-08-08T02:21:10+5:302015-08-08T02:21:10+5:30

नजीकच्या हिंगणी येथील कॅनरा बँकेचा सायरन मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वाजला. यामुळे हिंगणीत एकच खळबळ उडाली.

The midnight 'Siren' rolls down and runs | मध्यरात्री ‘सायरन’ वाजल्याने धावपळ

मध्यरात्री ‘सायरन’ वाजल्याने धावपळ

पोलिसांची तारांबळ : बँकेचा एकही अधिकारी मुख्यालयी नाही
सेलू : नजीकच्या हिंगणी येथील कॅनरा बँकेचा सायरन मध्यरात्रीच्या सुमारास अचानक वाजला. यामुळे हिंगणीत एकच खळबळ उडाली. बँकेचा एकही वरिष्ठ अधिकारी वर्धेत राहत नसल्याने सेलू पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. हा सर्व प्रकार गुरुवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली असतानाही नागरिकांचीही गर्दी झाली होती.
सविस्तर माहिती अशी की, हिंगणी बसस्थानकाजवळ कॅनरा बँकेची शाखा आहे. गुरुवारी रात्री आपातकालीन सायरन मध्यरात्री वाजण्यास सुरुवात झाली. सायरनचा आवाज कानी पडताच सेलू पोलीस ठाण्याचे रात्र गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक मिलिंद रामटेके यांनी लगेच घटनास्थळ गाठले. त्यांना बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता बँकेचे प्रबंधक गणवीर व संबंधित अधिकारी नागपूरवरुन ये-जा करीत असल्याची माहिती मिळाली. त्याचवेळी उपनिरीक्षक रामटेके यांनी सेलूचे ठाणेदार संतोष बाकल यांना प्रकाराची माहिती दिली. अखेर येथील अस्थायी कामगार सचिन टेकाम हा वानविहिरा येथील असल्याने त्याला घटनास्थळी आणण्यात आले.
त्याने बँकेचा दरवाजा उघडून पाहणी केली असता बँकेत कुणीही नसल्याचे दिसून आले. पोलिसांनी शहनिशा करून सायरन कसा वाजला याची चौकशी केली. वाजलेला सायरन आगीची सूचना देणारा असल्याचे समोर आले. मात्र बँकेत कुठेही आग लागली नसल्याचे दिसून आले.(शहर प्रतिनिधी)
बँकेचे अधिकारी नसल्याने रहस्य कायम
बँकेचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने व बँकेच्या सुरक्षेसाठी कुणीही चौकीदार नसल्याने काही अनुचित प्रकार किंवा दरोडा पडल्यास अशा वेळी कोण धावणार, अशा प्रकाराला जबाबदार कोण राहणार, असा प्रश्न हिंगणी येथील नागरिकांसह बँकेचे खातेदारही उपस्थित करीत आहे.
या प्रकारामुळे पोलीस प्रशासन बँकेला कोणत्या सूचना देतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. मध्यरात्री मिलिंद रामटेके, चालक शिरोडे व पोलीस शिपाई सुहास मडावी यांनी परिस्थिती हाताळली.
शुक्रवारीही बँकेचा कोणताही अधिकारी आला नसल्याने कोणशीही संपर्क झाला नाही. यावरुन बँकेचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

Web Title: The midnight 'Siren' rolls down and runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.