बाजारपेठेत वाहनतळाची सक्ती करावी
By Admin | Updated: August 7, 2015 02:00 IST2015-08-07T02:00:48+5:302015-08-07T02:00:48+5:30
शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या उग्ररूप धारण करताना दिसते. दुकानदार, नागरिकांनी स्वत:ची पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

बाजारपेठेत वाहनतळाची सक्ती करावी
वर्धा : शहरात दिवसेंदिवस पार्किंगची समस्या उग्ररूप धारण करताना दिसते. दुकानदार, नागरिकांनी स्वत:ची पार्किंग व्यवस्था करणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे प्रशासनानेच बाजारपेठेसह वर्दळीच्या ठिकाणी बांधकाम करणाऱ्या नागरिक, दुकानदारांना यापूढे वाहनतळाची सक्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहराची लोकसंख्या वाढली, वाहनांची संख्याही वाढली; मात्र रस्ते आहेत तसेच आहे. उलट काही रस्ते निमूळते झाले आहेत. विकासाच्या बाबतीत शहर अद्याप मागास आहे. केवळ नागरी वस्त्या वाढत आहेत. परिणामी, या सर्व बाबींचा भार वाहतूक व्यवस्थेवर पडताना दिसतो. बाजारपेठेत चार चाकी तर दूरच साधे दुचाकी वाहने उभी करण्यासही जागा राहत नाही, अशी स्थिती आहे. अनेक जण रस्त्यावरच वाहने उभी करतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते; पण पालिकेसह संबधित विभागाकडे याबाबत कुठलेही नियोजन नाही.
बाजारपेठेत आणि वर्दळीच्या इतर ठिकाणी नित्याने बांधकामे होत असतात; पण वाहनतळाचा विचारच केला जात नाही. बांधकामाला परवानगी मिळविताना कागदोपत्रीच वाहनतळ दाखविले जाते; पण प्रत्यक्षात वाहनतळाची व्यवस्था केली जात नाही. संबधित विभागाकडून केवळ अटी लादल्या जातात; पण त्याची पूर्तता होते की नाही, याची खात्री केली जात नाही. शहरात निर्मल बेकरी मार्ग, सराफा बाजार, सब्जी मार्केट, मालगुजारीपूरा रोड, अनाज लाईन यासह प्रमुख मार्गालगतच भव्य इमारती उभ्या झाल्या आहेत. या संपूर्ण भागातील एकाही इमारतीत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली नाही. परिणामी, सर्व ठिकाणी वाहतुकीची दररोज कोंडी होते. या गंभीर समस्येकडे जिल्हा प्रशासन व नगर पालिका दुर्लक्ष करीत असल्याचेच दितसे. यामुळे भविष्यात अडचणींमध्ये वाढच होणार आहे. हा प्रकार रोखण्यासाठी पार्किंग सुविधेची सक्तीच करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.(कार्यालय प्रतिनिधी)