आगरगावात घरांसह शाळेचे मोठे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:00 IST2020-05-12T05:00:00+5:302020-05-12T05:00:15+5:30
रविवारी सायकांळी सातच्या सुमारास देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख), लोणी, फत्तेपूर व नागझरी यासह काही भागांत वादळी वाºयासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. आगरगाव परिसरातील गावांमध्ये वादळी पावसाने अनेकांच्या घरांचे व यशवंत विद्यालयाच्या इमारतीचे नुकसान केले.

आगरगावात घरांसह शाळेचे मोठे नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरगाव : उकाड्याने हैराण झालेल्या आगरगावकरांना रविवारी काहीसा दिलासा मिळाला; मात्र रविवारी सांयकाळी सातच्या सुमारास गावासह परिसरातील गावांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे घरांसह शाळेचे नुकसान झाले.
मागील तीन ते चार दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती. एवढेच नव्हे, तर सकाळी गारवा, दुपारी प्रखर उष्णतामान आणि रात्री पाऊस असा काहीसा बदल जिल्ह्यातील काही गावांनी अनुभवला. मात्र रविवारी सायकांळी सातच्या सुमारास देवळी तालुक्यातील आगरगाव, पिपरी (ख), लोणी, फत्तेपूर व नागझरी यासह काही भागांत वादळी वाºयासह पावसाने चांगलीच हजेरी लावली. आगरगाव परिसरातील गावांमध्ये वादळी पावसाने अनेकांच्या घरांचे व यशवंत विद्यालयाच्या इमारतीचे नुकसान केले.
रविवारी सांयकाळी सहा वाजल्यापासूनच गावासह परिसरात जोरदार वारे वाहू लागले होते. त्यामुळे पाऊस येणार असा अंदाज बांधला होता. तो खरा ठरला.
आर्वीसह तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा
आर्वी : रविवारी रात्री आर्वीसह तालुक्यातील गावांना वादळी वाºयासह पावसाने तडाखा दिला. दरम्यान अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झाल्याने गावकऱ्यांना अंधारातच रात्र काढावी लागली. आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी, जळगाव, शिरपूर, टाकरखेडा, देऊरवाडा, टोणा, लाडेगाव, सर्कसपूर, राजापूर, निंबोली (शेंडे), अहिरवाडा, वाठोडा, वागदा, खुबगाव, नांदपूर, पाचेगाव, दहेगाव (म.), पिंपळखुटा, गुमगाव, चिंचोली (डांगे), वाढोणा, बेढोणा, सावळापूर, धनोडी, मांडला आदी गावात वादळीवाऱ्याने चांगलेच थैमान घातले. तालुक्यातील निंबोली येथील शेतातील गोठा, झाडे उन्मळून पडली तर अनेक शेतकऱ्याच्या शेतातील साहित्य वादळी वाऱ्याने उडून गेले. आर्वीतील काही वॉर्डात वादळी पावसाने झाडे पडली. रात्री उशिरापर्यंत तालुक्यात पावसाची रिपरिप सुरूच होती.
रोहणा परिसरात शेतकऱ्यांची दाणादाण
रोहणा : परिसरात रविवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान आकाशात एकदम काळे ढग दाटून आले आणि वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. परिसरात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलीत तर शेतातील गोठ्यांची पडझड झाली. वादळी पावसाने मोठे नुकसान झाले नसले तरी दर दोन-तीन दिवसांनी येणाऱ्या वादळी पावसाने जमीन कशी तापेल, ही चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. गोपालकांची वादळीवारा, पाऊस व विजांपासून जनावरांचे रक्षण करताना दाणादाण होत आहे.