महावितरण झोपेत; केली लोकांची झोप खराब !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2024 17:26 IST2024-06-11T17:25:31+5:302024-06-11T17:26:05+5:30
उन्हामुळे लोड वाढले : विद्युत पोल वाकल्याने वीजतारा लोंबकळताहेत

Mahavidaran fails to provide electricity even in urban areas
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी): जिल्ह्याचे तापमान पुन्हा एकदा तापायला लागले आहे. तापमान वाढले असताना महावितरणकडून विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. रात्री बेरात्री केव्हा बत्ती गुल होईल याचा काही नेम नाही. वीज वाहून नेणाऱ्या बहुतांश वीजतारा लोंबकळत असल्याने थोडी जरी हवा सुटली तरी आपसात तारांचा स्पर्श होऊन फ्यूज जळतो. परिणामी वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांची रात्र खराब होत असल्याचे चित्र आहे.
जून महिन्याचा आठवडा लोटला असूनही पारा तापलेलाच आहे. त्यामुळे आता सर्वच जण मान्सूनची प्रतीक्षा करत आहेत. महावितरणने मान्सूनपूर्व देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण केली असली, तरी ग्रामीण व शहरी भागातील विजेचा लपंडाव मात्र सातत्याने सुरूच आहे. थोडाही वादळ, वारा, पाऊस आला की, वीज गायब होत आहे. असा कोणताही दिवस नाही की, त्यादिवशी वीज गेली नाही. त्यामुळे लोकांची झोपही खराब होत असून, शहरासह ग्रामीण भागातील नागरिक महावितरणच्या ढिसाळ कारभाराला वैतागले आहेत. नागरिक उकाड्याने त्रस्त झाले आहेत.
अधूनमधून वीज गायब
दिवसभर उकाड्याने त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांना रात्रीतरी शांत झोप मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र, अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यास झोपमोड होते. उष्मामुळे अंगाची लाहीलाही होते. झोपेमुळे हैराण झाल्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा असते.
तक्रारी वाढल्या
अचानक विजेचा दाब वाढल्याने संबंधित फिडरवरील ग्राहकांना फटका बसतो. विद्युत उपकरणे खराब होत आहेत. वादळी वाऱ्यामुळे खांब वाकत असून कुठे तर रोहित्र सुद्धा जमीनदोस्त होत आहे. दुपारच्या वेळेत वीजपुरवठा अचानक खंडित होऊन ग्राहकांची झोपमोड होते. तक्रारीसुद्धा वाढल्या आहेत.
वीज जाण्याची कारणे काय?
• वीजवाहिनी तुटणे, रोहित्रातील बिघाड, वाहिन्या खराब होणे, वाऱ्यामुळे वीज तारांचे घर्षण, उपकेंद्रातील बॅटरी नादुरुस्त, रोहित्रातील तेल संपणे यासारख्या विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत असतो. सध्या तापमान वाढले आहे. मात्र, पावसाचा शिडकावा सुरू होण्याची लक्षणे दिसताच वीजपुरवठा खंडित केला जातो.
• पिन इन्स्युलेटर, डिस्क इन्सुलेटर उन्हामुळे तापलेले असल्याने पावसाचे • पाणी पडताच फुटण्याचा धोका असल्याने खबरदारी म्हणून महावितरणकडून वीजपुरवठाच बंद केला जातो. वाऱ्यामुळे वीजवाहिनी तुटण्याचे प्रकार आता वाढू लागले आहेत. त्यामुळे दुरुस्तीसाठी वेळ जातो. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केला जातो.
• मान्सूनपूर्व कामाला महावितरणने गती। दिली आहे. ताराच्या बाजूचे झाडे तोडणे, धोकादायक वीज तार बदलवणे आदी काम करताना वीजपुरवठा खंडित करण्यात येत असतो.
सर्वच भागात हाल बेहाल
दिवसभरात अधूनमधून वीजपुरवठा गायब होत असल्याने कार्यालयीन कामकाजावर परिणाम होतो. वीजपुरवठा गायब होण्याची अनेक कारणे असली तरी तक्रारीही वाढल्या आहेत. याशिवाय सर्वच भागात हाल बेहाल आहेत.