Lower Wardha Project Housefull; After decades, the river was clean | निम्न वर्धा प्रकल्प हाऊसफुल्ल; दशकानंतर नदीपात्र झाले स्वच्छ

निम्न वर्धा प्रकल्प हाऊसफुल्ल; दशकानंतर नदीपात्र झाले स्वच्छ

ठळक मुद्देनदी-नाल्यांनाही आला पूर गावांतील पाणीपुरवठा योजनेला बळकटी

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यात पावसाचा अजूनही जोर कायमच असल्याने जिल्ह्यातील जलाशयांची पाणी पातळी यंदा चांगलीच वाढली आहे. अशातच आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्प शतप्रतिशत भरल्याने या धरणाचे सोमवारी रात्री ३१ ही दरवाजे उघडण्यात आले. या पाण्याच्या प्रवाहाने परिसरातील नदींना पूर आल्याने दशकानंतर सर्व नदी पात्रातील घाण स्वच्छ झाले आहे. तसेच गावातील पाणीपुरवठा योजनांनाही मोठी बळकटी मिळाली आहे.
आर्वी तालुक्यातील धनोडी येथे वर्धानदीवर निम्न वर्धा धरणाची निर्मिती करण्यात आली. या धरणाला ३१ दरवाजे असून या धरणातील पाणी वर्धा नदीसह यशोदा नदीसह इतरही नद्यांना मिळतात. त्यामुळे परिसरातील नदी-नाले फुगून जातात. या नदीपात्रावरुन अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनाही कार्यान्वीत करण्यात आल्या आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून धरणातील पातळी वाढली नसल्याने नद्यांनाही पूर आले नाही. परिणामी नदीपात्रात अस्वच्छतेसह पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाल्या होत्या. गेल्या उन्हाळ्यात अनेक गावांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागल्या. पण, यंदा उशिरा का होईना वरुणराजाचे आगमन झाले असून ते अद्यापही कायम असल्याने जलाशयांची कधी नव्हे इतकी पातळी वाढली आहे. जिल्ह्यातील ११ मोठ्या व मध्यम जलाशायांपैकी जवळपास ५ जलाशय शतप्रतिशत भरले आहे. यात निम्न वर्धा प्रकल्पाचाही समावेश आहे. सोमवारच्या मध्यरात्री या धरणाचे ३१ दरवाजे ३ सेमी ने उघडण्यात आले असून ९० दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे नदी-नाले दुथड्या भरुन वाहत असल्याने नदीपात्रही स्वच्छ झाले आहे. अनेक वर्षांपासून साचलेला गाळ या पुराने पुर्णत: वाहून गेल्याने नदीपात्रही खोल झाले आहेत. त्यामुळे भविष्यकालीन पाणी टंचाईचा प्रश्न सध्या तरी निकाली निघाला आहे.

२९ गावांना सतर्कतेचा इशारा
च्निम्न वर्धा धरणाच्या पाण्यामुळे वर्धा व यशोदा नदी काठावरील २९ गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामध्ये वर्धा नदीपात्रालगत असलेल्या शिरपूर, खाडा, अंदोरी, कांदेगाव, रोहिणी, तांबा, हिवरा, सावंगी (येंडे), बाभुळगाव, निमगव्हाण, बोपापूर, आंजी (लहान), दहेगाव (धांदे), आपटी, नांदगाव, कवडगाव, वाघोली व पुलगाव या गावांसह वर्धा नदीशी संलग्न असणाऱ्या यशोदा नदी काठावरील डिगडोह, दिघी, बोपापूर, आलोडा, सरुळ, बोरगाव, टाकळी, जामणी, कोल्हापूर(सि) या गावांचा समावेश आहे.

प्रशासनाकडे सुरक्षेची वानवा
च्वर्धा नदी काठावरील २९ गावे देवळी तालुक्यात येत असून वारंवार निर्माण होणाºया पूर परिस्थितीमुळे मालमत्ता, जनावर आणि बºयाचदा मनुष्यहानी होते. मात्र अशा परिस्थितीत नदीपात्रात तत्काळ मदत पोहोचण्यासाठी तालुका आपत्ती विभागाकडे एकही लाईफ बोट उपलब्ध नाही. याशिवाय लाईफ जॅकेत, १० फोल्डिंग स्टेचर, १ सर्चलाईट, १० प्रशिक्षित तराग, १० बचाव गॉगल्स, ३ गम बूट आणि १ प्रथमोपचार पेटी इतके साहित्य असून तालुका प्रशासन एवढ्या तोकड्या सामग्रीव्दारे लोकांचे जीव वाचू शकेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: Lower Wardha Project Housefull; After decades, the river was clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.