उत्तम गाल्वाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो
By Admin | Updated: June 20, 2017 01:04 IST2017-06-20T01:04:37+5:302017-06-20T01:04:37+5:30
भूगाव येथील उत्तम गाल्वा कंपनी एकमेव असून यात येथील अनेक युवकांना रोजगार मिळाला आहे.

उत्तम गाल्वाकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला खो
कर्मचाऱ्यांना कामावर घेण्यास नकार : कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : भूगाव येथील उत्तम गाल्वा कंपनी एकमेव असून यात येथील अनेक युवकांना रोजगार मिळाला आहे. सध्या या कंपनीतून स्थानिक कामगारांना कमी करण्याचा सपाटा लावल्याने येथे आंदोलने सुरू झाली आहेत. या आंदोलनाची दखल घेत जिल्ल्हाधिकाऱ्यांनी कामगार कल्याण अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामावरून नियमबाह्य कमी केलेल्या सात कामगारांना कामावर घेण्याच्या सूचना केल्या. मात्र कंपनीकडून या सूचनांना केराची टोपली दाखविली आहे. यासंदर्भात सोमवारी पुन्हा निवासी जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याशी कामगारांनी चर्चा केली.
या कंपनीत परिसरातील तळेगाव (श्यामजीपंत), बोरगाव, भूगाव व वर्धेततील अनेक युवकांना रोजगार मिळाला. प्रारंभी या कंपनीकडून त्यांना दिलासा मिळत होता. मात्र आता या कंपनीकडून स्थानिकांना डावलून बाहेर जिल्ह्यातील कामगारांना घेण्यात येत आहे. यामुळे संतापलेल्या कामगारांकडून विचारणा झाली असता त्यांना उत्तर मिळाले नाही. यामुळे त्यांच्याकडून आंदोलन पुकारण्यात आले. या आंदोलनात आमदार बच्चू कडू यांनी उडी घेत कामगारांना कामावर घेण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या झटापटीत काही कामगारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्यांना कंपनीतून कमी करण्यात आले. त्यांची कामावर परत घेण्याची मागणी सुरूच आहे.
दरम्यान ज्या कामगारांवर गुन्हे दाखल नाही अशा कामगारांना कामावर घेण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीला सूचना केली. यात आकाश नरसिंंगकर, हेमराज पोहाणे, दिनेश नरड, महेश गाडेगोणे, अपुन हुड, चरण मसराम, संजय यादव या सात कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र घेवून हे कर्मचारी कंपनीत गेले असता त्यांना कामावर घेताना वर्धेत नाही तर बाहेर राज्यात जाण्याची अट लादण्यात आली. यामुळे संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी सोमवारी पुन्हा जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे यांच्या मार्गदर्शनात निवासी उपजिल्हाधिकारी मंगेश जोशी यांच्याशी चर्चा केली. त्यांनी यावर लवकरच मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
परराज्यात जाण्याचे निर्देश
जिल्हाधिकाऱ्यांनी या सात कामगारांना जिल्ह्यातील कंपनीत कामावर घेण्याऐवजी बाहेर राज्यात पाठवून मानसिक त्रास देण्याचा घाट रचल्याचा आरोप कामगारांचा आहे.