Lok Sabha elections 2019 - PM Narendra Modi will launch a campaign from Wardha city | वर्धा नगरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी फोडणार प्रचाराचा नारळ 
वर्धा नगरीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी फोडणार प्रचाराचा नारळ 

वर्धा - आगामी लोकसभा निवडणुकीचं मैदान मारण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपा-शिवसेना युतीचा प्रचारही सध्या जोरात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 मार्च रोजी महात्मा गांधी यांच्या भूमीतून म्हणजे वर्धा येथून प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती भाजपाचे खासदार रामदास तडस यांनी दिली. 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांनी पहिली सभा वर्धा येथेच घेतली होती. त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं त्यामुळे यंदा सुद्धा प्रचाराचा शुभारंभ वर्धा येथूनच करण्याचे भाजपाने ठरवले आहे. वर्धा येथील जुन्या आरटीओ जवळील स्वावलंबी मैदानावर २८ मार्च रोजी  सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेनंतर भाजपच्या संपूर्ण देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु करणार आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर्धा दौऱ्यामध्ये पंतप्रधान सेवाग्रामला भेट देणार आहेत. महात्मा गांधी यांची  कर्मभूमी म्हणून वर्धा देशात प्रसिद्ध आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांना अभिवादन करीत नरेंद्र मोदी काँग्रेसच्या गांधी परिवाराविरुद्ध रणशिंग फुंकणार आहेत. वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून प्रदेश महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. चारुलता टोकस यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांच्या आई दिवंगत प्रभा राव या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसकडूनही ज्येष्ठ नेत्यांच्या सभा वर्धा मध्ये घेण्यात येणार आहे.

मागील निवडणुकीतही विद्यमान भाजपाचे खासदार रामदास तडस यांच्या प्रचाराकरिता नरेंद्र मोदी यांनी सभा घेतली होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात पूर्ण तयारी झाली असून, प्रचाराकरिता ५० हजारपेक्षा अधिक कार्यकर्ते येणार असल्याचं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

अद्याप भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारांची  यादी जाहीर करण्यात आली नाही,मात्र लवकरच भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून उमेदवारांच्या यादीची घोषणा करण्यात येईल असं सांगण्यात येतंय. नरेंद्र मोदी यांच्या प्रचार सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार हे अजून स्पष्ट नाही. 


Web Title: Lok Sabha elections 2019 - PM Narendra Modi will launch a campaign from Wardha city
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.