जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

By Admin | Updated: July 8, 2014 23:35 IST2014-07-08T23:35:55+5:302014-07-08T23:35:55+5:30

शेतकऱ्यांच्या मागणीवरून शासनाने नाफेडमार्फत चना, तुरीची खरेदी केली; पण अद्याप चुकारे देण्यात आले नाहीत़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ याबाबत जिल्हा प्रशासनास वारंवार निवेदने दिली,

Locked to the Collector's office | जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

जिल्हाधिकारी कार्यालयाला ठोकले कुलूप

किसान अधिकार अभियानचे आंदोलन : नाफेडकडे थकले चुकाऱ्याचे कोट्यवधी रुपये
वर्धा/घोराड : शेतकऱ्यांच्या मागणीवरून शासनाने नाफेडमार्फत चना, तुरीची खरेदी केली; पण अद्याप चुकारे देण्यात आले नाहीत़ यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत़ याबाबत जिल्हा प्रशासनास वारंवार निवेदने दिली, चर्चा केली; पण कुठलीही कारवाई झाली नाही़ यामुळे त्रस्त होऊन सोमवारी किसान अधिकार अभियानने जिल्हाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकले़ या प्रकरणी किसान अधिकारच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हाही दाखल करण्यात आला़
सेलू तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी नाफेडला चना, तुरी विकल्यात़ रोखीने वा दहा दिवसांच्या आत चुकारे देण्याची हमी शासनामार्फत देण्यात आली होती; पण कित्येक दिवसांपासून शेतकऱ्यांना चुकारेच देण्यात आलेले नाहीत़ यामुळे केवळ सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांचे सुमारे ३ कोटी ५२ लाख रुपये अडकले आहेत़ जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, देवळी, हिंगणघाट, समुद्रपूर, आर्वी, कारंजा येथील नाफेडची शासकीय आधारभूत हमी भावात किमतीनुसार खरेदी करण्यात आली. नाफेडने खरेदी केलेल्या तुरीचे २१ फेब्रुवारीपर्यंतचे चुकारे अद्यापही अदा करण्यात आले नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तुरीचे ५७ लाख रुपये नाफेडकडे अडकले आहेत़ ६ मे पासून चन्याचे चुकारेही देण्यात आलेले नाहीत़ यामुळे शेतकऱ्यांचे २ कोटी ९५ लाख रुपये थकले आहेत़
चुकाऱ्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करूनही शासनाकडून अद्याप तुरी व चन्याच्या चुकाऱ्यापोटी थकलेले ३ कोटी ५२ लाख रुपये उपलब्ध करून देण्यात आलेले नाही़ यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत़ यावर्षी खरीप हंगामात अद्यापही पाऊस आलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे़ खते, बी-बियाणे यांची खरेदी उसनवारीने केली़ आता पुन्हा बी-बियाणे, खते कसे खरेदी करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़ शासनाकडे रक्कम थकली असताना ती उपयोगी पडत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत़ या गंभीर बाबीकडे लक्ष देत शासनाने शेतकऱ्याचे तुरी व चण्याचे चुकारे देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी किसान अधिकार अभियान व शेतकऱ्यांनी केली आहे़ यासाठी सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप ठोकण्यात आले़
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण शेतकऱ्यांना मदत करू शकत नसेल तर ते प्रशासन काय उपयोगाचे, अशी भूमिका घेत कुलूप ठोकण्याचे आंदोलन पूर्ण करण्यात आले़ यात किसान अधिकारचे मुख्य पे्ररक अविनाश काकडे, पंढरी ढगे, पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सहभाग घेतला़(कार्यालय प्रतिनिधी/वार्ताहर)

Web Title: Locked to the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.