दिवाळ सणातही भटकंतीचेच जगणे

By Admin | Updated: October 30, 2016 00:52 IST2016-10-30T00:52:38+5:302016-10-30T00:52:38+5:30

हिंदू संस्कृतिमध्ये सण, उत्सवांना प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय परंपरांचा भारी पगडा असल्याने गरीब असो वा श्रीमंत तो सणांची श्रीमंती पाळल्याशिवाय राहत नाही.

Living in a dewy evening trip | दिवाळ सणातही भटकंतीचेच जगणे

दिवाळ सणातही भटकंतीचेच जगणे

पाल टाकून राहुटी : उदरनिर्वाहासाठी विविध वस्तूंच्या विक्रीसाठी वणवण
प्रशांत हेलोंडे  वर्धा
हिंदू संस्कृतिमध्ये सण, उत्सवांना प्रचंड महत्त्वाचे स्थान आहे. शिवाय परंपरांचा भारी पगडा असल्याने गरीब असो वा श्रीमंत तो सणांची श्रीमंती पाळल्याशिवाय राहत नाही. प्रसंगी डोईवर कर्जाचा भारा सहन करीत सण, उत्सव साजरा करण्याकडे नागरिकांचा कल असतो; पण भटकंतीचे जीवन जगणाऱ्या, दोन वेळच्या जेवणासाठी जीवाचे राण करणाऱ्या, मुला-बाळांसाठी काही करता येते का यासाठी झटणारा एक वर्ग प्रत्येक सणांपासून अलिप्तच दिसून येते. समाजातील हे वास्तव कधी बदलणार, असाच सवाल जणू ती पाल टाकून वास्तव्य करणारी कुटुंबे करताना दिसतात.
भारतीय समाज हा सण, उत्सव प्रिय आहे. प्रत्येक सण मग, तो कोणत्याही धर्म, जाती, समाजाचा असो येथे गुण्यागोविंदाने साजरा करण्यासाठी सर्वच जण धडपडत असल्याचे दिसते; पण काही कुटुंबे या सर्वांपासून अलिप्त असल्याचेच पाहावयास मिळते. त्यांच्या चिमुकल्यांना कसल्याही सण, उत्सवांची भ्रांत नसते. किंबहुना, कधी कुठला सण आहे, हे देखील या चिमुकल्यांना माहिती नसते. त्यांना केवळ कळते ते आई-वडिलांच्या सोबत अमूक वस्तू विकायला जायचे आहे. आता आपल्या सोबतचे सर्व कोणत्या गावात जाणार, तेथे किती दिवस राहणार हे देखील त्यांना माहिती नसते.
यंदा दिवाळीचा सण हा सोयाबीन काढणीच्या वेळेवरच आला आहे. यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी आणि विक्रीची लगबग सुरू आहे. यासाठी महाराष्ट्रातील मराठवाडा, चंद्रपूर जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातील मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या मजुरांना कुठल्याही सणाची तमा नाही. केवळ दोन वेळच्या जेवणाची वा महिनाभर जगण्यापूरता पैसा कसा जमविता येईल, याचीच चिंता असते. यासाठी कुटुंबातील आबालवृद्ध या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात शेतांमध्ये राबताना दिसून येतात. या कुटुंबातील मुले-मुलीही शिक्षणाचा नाद सोडून आई-वडिलांच्या संगतीने शेतात राबताना दिसून येतात.
या कुटुंबांवरही हार्वेस्टरने गंडांतर आणले आहे. दिवाळी हा महत्त्वाचा सण तोंडावर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी लगबगीने शेतातील सोयाबीनची सवंगणी केली. सोयाबीनच्या भरवशावरच दिवाळी असल्याने शेतकऱ्यांचाही नाईलाज होता; पण या मजूर कुटुंबांचा मात्र पोटमारा झाल्याचे चित्र जिल्हाभर पाहावयास मिळत आहे. १०० कुटुंबे शहरात दाखल झाली असतील तर त्यातील ६० ते ७० कुटुंबांना काम मिळत असल्याचे चित्र आहे. दिवाळी सणासाठी विविध वस्तूंची विक्री करण्याकरिताही काही कुटुंबे शहरात डेरेदाखल झाली आहेत. या कुटुंबांचीही अशीच करुण कहाणी आहे. दिवसभर वस्तूंची विक्री केल्यानंतर सायंकाळी आपल्या चिमुरड्यांना भरवण्याइतपत मिळकत त्यांच्या पदरी पडत असल्याचे दिसून येते. शहराच्या काही भागात पाल टाकून वास्तव्य करणारी कुटुंबे आढळतात. या कुटुंबीयांना कुठल्या सणाचा मागमुस नसतो. केवळ पोटाची खळगी भरणे आणि त्यातून काही पदरी राहिले तर सण, उत्सव हेच त्यांचे जीवण झाल्याचे दिसून येत आहे. समाजातील हे वास्तव गत कित्येक वर्षांपासून बदलाची अपेक्षा केली जात आहे; पण ती निरर्थक ठरत असल्याचेच दिसून येत आहे. गावोगावी भटकंती करणाऱ्या या कुटुंबांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या चिमुकल्यांना शिक्षणाचा गंध देण्याकरिता चिंतन व कार्याची जोड गरजेची झाली आहे.

Web Title: Living in a dewy evening trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.