A little rain lost the joy of Shravan month | अल्प पावसाने श्रावण मासातील हर्ष लोपला

अल्प पावसाने श्रावण मासातील हर्ष लोपला

ठळक मुद्देउकाडा कायम : स्वच्छ, सुंदर नदीपात्रात उगवले गवत; उन्हाळ्यात टाकलेला काडीकचराही कायम

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : ‘श्रावण मासी, हर्ष मानसी; हिरवळ दाटे चोहीकडे’ या ओळींनी श्रावण मासातील बालकवींनी केलेले वर्णन यावर्षी कालबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. वातावरणातील उकाडा अद्यापही कायम असून दरवर्षी श्रावण महिन्यात स्वच्छ, सुंदर दिसणारे नदीपात्र यावर्षी गवत उगवल्याने बेढब दिसत आहे. यावर्षी आत्तापर्यंत झालेल्या अल्प पावसामुळे श्रावण मासातील हर्ष लोपला.
कुरखेडा तालुक्यातील शिरपूर-खरकाडा मार्गावर असलेल्या पुलावरून दिसणारा नदीपात्राचा बराच भाग गवताने व्यापला आहे. दरवर्षी स्वच्छ, सुंदर दिसणारे व रेती पसरलेले नदीपात्र यावर्षी गवत व काडीकचऱ्याने व्यापले आहे.
अनेकजण गावातील काडीकचरा नदीपात्रात नेऊन टाकतात. यावर्षी नदीला पूर न आल्याने हा कचरा पात्रात कायम आहे. त्यामुळे नदी पात्र अस्वच्छ दिसते. याशिवाय पात्रात गवत उगवल्याने नदीचे स्वरूप पालटल्याचे दिसून येते. याशिवाय गावालगतच्या वृक्ष वेलीची तोड अनेक शेळीपालकांनी केल्याने गावाशेजारील हिरवळही नष्ट झाली आहे. गावाशेजारून वाहणाऱ्या नद्यांचे किनारे उजाड दिसत आहेत. श्रावण मासात पावसाच्या सरी व कोवळे उन्ह अनुभवास यायचे. त्यामुळे श्रावण मासातील आनंद निराळा असायचा. परंतु यावर्षी अल्प पाऊस व शेतकऱ्यांची हतबलता सर्वकाही नैराश्य देणारे आहे. पूर्वीसारखा अनुभव यावर्षीच्या श्रावण मासात अनुभवता आला नाही. शेतकरी अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Web Title: A little rain lost the joy of Shravan month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.