लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) येथील मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज उत्पादन प्रकरणाच्या तपासणीची जबाबदारी महसूल गुप्तचर संचालनालयाने हाती घेतली असून, आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. शनिवारी रात्री १३ तारखेला, एका वकिलासह तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून, ही माहिती सार्वजनिक झाल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत.
कारंजा शहरात असलेल्या एमडी ड्रग उत्पादन युनिटवर महसूल गुप्तचर संचालनालयाने छापा मारला होता. या धडक कारवाईत तब्बल १९२ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे १२८ किलो मेफेडॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, दोन आरोपी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिस कोठडीतून कारंजा येथील दोन व्यक्ती पीयूष (पेशाने वकिल) आणि आसीम यांची नावे समोर आली. तपास आणखी गहन स्वरूपाचा असल्याने, स्थानिक पोलिसांना सुगावा न लागू देता अत्यंत गुप्ततेने शनिवारी रात्री कारंजा येथे पोहोचून महसूल गुप्तचर संचालनालयाने दोघांना अटक केली. आणखी कोण-कोण सहभागी आहेत, याचा पर्दाफाश होणार आहे.
प्रकरणाचा ताण वाढला...
मुख्य आरोपी वैभव अग्रवाल याच्याकडे लक्ष वेधले जात आहे. तो कारंजा शहरात मेंटेनन्सच्या कामावर होता, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्त करत होता, तसेच पोलिस ठाण्यामध्ये देखील त्याने कॅमेरे बसवले होते. मात्र, त्याचा मुख्य व्यवसाय मेफेड्रॉन ड्रग्ज उत्पादनाचा होता, हे कोणीही जाणत नव्हते, अशी आश्चर्यकारक गोष्ट समोर आली आहे. आरोपींच्या डीसीआरमध्ये अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे फोन नंबर आढळून आल्याने या प्रकरणाचा ताण वाढला आहे. त्यामुळे आता कोणकोणते मोठे मासे गळाला लागणार हे महत्वाचे आहे.
प्रशासन अन् जनमानसांचे कारवाईकडे लागले लक्ष...
पालकमंत्री आणि गृहराज्य मंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या देखरेखीखाली असलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अशी धक्कादायक घटना उघडकीस आल्याने पोलिस प्रशासनावर ताशेरे ओढले जात आहेत. त्यामुळे पोलिस अधीक्षक तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर विभागीय चौकशी होईल की नाही, याकडे वेळोवेळी लक्ष लागले आहे. हे प्रकरण पुढे कसे वळण घेते, कोणावर कारवाई होते. याकडे संबंधित प्रशासन आणि जनमानस दोघेही लक्ष लावून बसले आहे.
सहा कर्मचारी अटॅच, काहींना मात्र पाठबळ...
या प्रकरणामुळे कारंजा पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस दलात अनेकांनी स्वतःला कारवाईच्या फेऱ्यात न अडकवण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती मिळाली आहे. अनेक जण आपला बचाव करताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कारंजा पोलिस ठाण्यातील सहा कर्मचाऱ्यांना मुख्यालयात अटॅच करण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, काहींना अभय का दिले जात आहे, हे अजूनही अस्पष्ट असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
Web Summary : Wardha drug bust reveals lawyer involvement to bypass legal hurdles. 192 crore worth of mephedrone seized, arrests made. Police scrutiny intensifies amid suspicions of internal collaboration, sparking departmental inquiries and public concern.
Web Summary : वर्धा में ड्रग भंडाफोड़: कानूनी बाधाओं से बचने के लिए वकील शामिल। 192 करोड़ का मेफेड्रोन जब्त, गिरफ्तारियां। आंतरिक मिलीभगत के संदेह के बीच पुलिस जांच तेज, विभागीय जांच और सार्वजनिक चिंता बढ़ी।