Inviting death to 'those' | ‘त्या’ सळाखी देताहेत मृत्यूला आमंत्रण
‘त्या’ सळाखी देताहेत मृत्यूला आमंत्रण

ठळक मुद्देआचार्य विनोबा भावे उड्डाणपूल : खड्ड्यांनी विणले जाळे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, काम करताना संबंधित कंत्राटदाराकडून निष्काळजीपणा केला जात आहे. बोरगाव (मेघे)कडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंत तोडण्यात आली. मात्र, त्यातून बाहेर निघालेल्या सळाखी मृत्यूला आमंत्रण देणाऱ्या ठरत आहेत. याकडे कंत्राटदार आणि देखरेखीची जबाबदारी असलेल्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत आहे.
शहरात तत्कालीन सरकारच्या काळात मंजूर विकासकामे अद्याप सुरू आहेत. आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाचेही नव्याने बांधकाम केले जात आहे. जुन्याचे पुलाचे तोडकाम कंत्राटदाराच्या वतीने केले जात आहे. मात्र, काम करताना रहदारीच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठल्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. उड्डाणपुलाचे काम आधीच कासवगतीने सुरू आहे. यातच कंत्राटदार आणि संबंधित एजन्सीकडून निष्काळजीपणा केला जात असल्याने वाहनचालक, पादचाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावरून हिंगणघाट, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, देवळीकडे जाणाºया वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. उड्डाणपुलाचे नव्याने बांधकाम सुरू असताना दुसरीकडे पुलावरील खड्ड्यांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष आहे. उड्डाणपुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले आहे. हे खड्डे चुकविण्याच्या नादात वाहनचालकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. खड्यांमुळे वाहनचालक त्रस्त असतानाच जुन्या उड्डाणपुलाच्या तोडकामातील सळाखी बाहेर डोकावत असून मृत्यूला आमंत्रण देणाºया ठरत आहेत.

कंत्राटदाराचा निष्काळजीपणा
कृषी उत्पन्न बाजार समिती, वीज महावितरण कार्यालय, फार्मसी महाविद्यालय, सावंगी रुग्णालयात जाण्याकरिता रुग्ण, नागरिक आणि नोकरदारांना याच उड्डाणपुलावरून जावे लागते. उड्डाणपुलावर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी वर्दळ असते. यातच कंत्राटदाराकडून केला जात असलेला निष्काळजीपणा गंभीर बाब ठरत आहे. पुलाचे बहुतां काम पूर्णत्वास गेले आहे. बोरगाव (मेघे) कडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भिंतीचे तोडकाम सुरू आहे. मागील कित्येक दिवसांपासून हे काम सुरू आहे. बाहेर आलेल्या सळाखी वाहतुकीकरिता धोकादायक ठरत आहेत. सळाखीमध्ये अडकून वाहनचालकांना मोठा अपघात होऊ शकतो.

जुना उड्डाणपूल जीर्ण झाल्याने नव्याने उड्डाणपुलाचे बांधकाम मागील काही महिन्यांपासून केले जात आहे. जुन्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्ड्यांनी जाळे विणले आहे. दुचाकीचालकांना येथून जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागते. खड्ड्यांमुळे अनेकवार चारचाकी वाहने नादुरुस्त होतात. परिणामी वाहतूक ठप्प होते आणि बोरगाव (मेघे), सावंगी (मेघे) बसस्थानकापर्यंत वाहनांच्या रांगा लागतात.

Web Title: Inviting death to 'those'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.