भाजपच्या मुलाखती; २१ जणांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 22:40 IST2019-08-29T22:39:11+5:302019-08-29T22:40:06+5:30
चार विधानसभा मतदार संघापैकीत देवळी आणि आर्वी मतदार संघ वगळता हिंगणघाट आणि वर्धेत भाजपाचेच विद्यमान आमदार आहे. तरिही चारही मतदार संघाकरिता ईच्छूक उमेदवारांच्या आज विश्राम गृहात मुलाखती घेण्यात आल्या. भाजपाचे निरिक्षक तथा ठाणेचे आमदार संजय केळकर यांनी चारही मतदार संघातील २१ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.

भाजपच्या मुलाखती; २१ जणांची उपस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपा पक्षानेही मोर्चेबांधणी सुरु केली असून त्याची सुरुवात ईच्छूक उमेदवारांच्या मुलाखतीपासून करण्यात आली. गुरुवारी विश्रामगृहात पार पडलेल्या मुलाखतीत चारही विधानसभा मतदार संघातून तब्बल २१ उमेदवारांनी भाजपाकडे उमेदवारी मागितली आहे. यात नवख्यांनीही हजेरी लावल्याने अनेकांची धडधड वाढली आहे.
चार विधानसभा मतदार संघापैकीत देवळी आणि आर्वी मतदार संघ वगळता हिंगणघाट आणि वर्धेत भाजपाचेच विद्यमान आमदार आहे. तरिही चारही मतदार संघाकरिता ईच्छूक उमेदवारांच्या आज विश्राम गृहात मुलाखती घेण्यात आल्या. भाजपाचे निरिक्षक तथा ठाणेचे आमदार संजय केळकर यांनी चारही मतदार संघातील २१ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. सुरुवातीला पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली. त्यानंतर दुपारी मुलाखतीला सुरुवात झाली.
. या मुलाखतीमध्ये हिंगणघाट मतदार संघ वगळता तिन्ही मतदार संघात एकापेक्षा अधिक ईच्छूकांनी उमेदवारी मागितली आहे. विशेषत: ईच्छुकांमध्ये काही सामाजिक कार्यात सक्रीय असलेल्यांचा आणि पक्षातीलच पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने पेचप्रसंग निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे.
वर्धा आणि देवळी मतदारसंघावरच जोर
वर्धा मतदार संघात भाजपाचेच विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर असतानाही या मतदार संघातून तब्बल ९ जणांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये डॉ.पंकज भोयर यांच्यासह माजी खासदार सुरेश वाघमारे, नगराध्यक्ष अतुल तराळे, डॉ. सचिन पावडे, सचिन अग्निहोत्री, सुरेश पट्टेवार, वरुण पांडे, माया उमाटे व राणा रणनवरे यांचा समावेश आहे. तसेच देवळी मतदार संघ काँग्रेसच्या ताब्यात असल्याने तो बळकावण्याकरिता भाजपाचे कंबर कसली आहे. या मतदार संघातून तब्बल ९ जणांनी उमेदवारी मागितली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शिरिष गोडे, वैभव काशिकर, मिलिंद भेंडे, अर्चना वानखेडे, जयंत येरावार व संजय गाते, किरण उरकांदे यांचा समावेश आहे.
हिंगणघाटमध्ये एक तर आर्वीत चार
हिंगणाघाट मतदार संघात भाजपाचेच समीर कुणावार विद्यमान आमदार आहे. या मतदार संघातून त्यांच्या व्यतिरिक्त कोणीही उमेदवारी मागितली नाही. तर आर्वी मतदार संघात काँगेसच विद्यमान आमदार असल्याने भाजपाकडून चौघांनी उमेदवारी मागितली आहे. यामध्ये माजी आमदार दादाराव केचे, सुधीर दिवे, डॉ.सचिन पावडे व राहुल ठाकरे यांचा समावेश आहे.