वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 06:00 IST2020-03-01T06:00:00+5:302020-03-01T06:00:16+5:30
उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह वर्ध्याच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, तलाठी खवास व कनिष्ठ लिपीक बडे यांचे पथक सकाळी गस्तीवर असताना कन्हानची वाळू भरलेले ट्रक वर्ध्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पाळत ठेवली. दरम्यान चौदा चाकांचा ट्रेलर एम. एच. ३२ ए.जे.५६९२ हा वर्ध्यातील गांधी चौकातून सेवाग्रामकडे जाताना दिसला.

वाळूची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरात मोठ्याप्रमाणात अवैधरित्या कन्हानच्या वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच उपविभागीय अधिकाऱ्यांसह सेलू व वर्धा येथील तहसीलदारांनी पाठलाग करुन सेवाग्राम परिसरात वाळू भरलेला एक मोठा ट्रक जप्त केला. तर दोन ट्रक पळून जाण्यात यशस्वी झाले. जप्त केलेल्या ट्रकचालकाविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्यासह वर्ध्याच्या तहसीलदार प्रिती डुडुलकर, सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, तलाठी खवास व कनिष्ठ लिपीक बडे यांचे पथक सकाळी गस्तीवर असताना कन्हानची वाळू भरलेले ट्रक वर्ध्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पाळत ठेवली. दरम्यान चौदा चाकांचा ट्रेलर एम. एच. ३२ ए.जे.५६९२ हा वर्ध्यातील गांधी चौकातून सेवाग्रामकडे जाताना दिसला. पथकाने त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो भरधाव पुढे निघून गेला. त्यामुळे या ट्रकचा पाठलाग करुन सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या समोर तो पकडला. चालकाला रॉयल्टी विचारली असता त्याच्याकडे रॉयल्टी नसल्याने तहसीलदार डुडुलकर यांनी सेवाग्राम पोलिसात तक्रार नोंदविली. तक्रारीवरुन ट्रक चालक व्यंकट विनोद नागरिकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ट्रक जप्त केला असून पुढील कारवाई सुरु होती. हा ट्रक कैलास धारवाल, रा. वर्धा यांच्या मालकीचा असल्याचे चालकाने सांगितले आहे. त्यामुळे आता ट्रक मालकावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. पुढील ट्रक पकडताच मागाहून येणाºया वाळू भरलेल्या दोन ट्रकने सेलूच्या दिशेने यशस्वी पळ काढला.
कन्हानच्या रेती वाहतुकीवर ‘वॉच’
महसूल विभागाच्या पथकाने आता कन्हानच्या वाळूवर लक्ष वळविले आहे. एक टॉलर जप्त केले असता त्यामध्ये १४.४३ ब्रास कन्हानची वाळू आढळून आली. उपविभागीय अधिकाऱ्यांनी या टॉलरला पाच लाख रुपये दंड ठोठावला आहे. आता वाळू आणि वाहन मिळून याचा दंड जवळपास साडेतेरा लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
शहरातून कन्हानच्या वाळूची मोठ्याप्रमाणात अवैध वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले आहे. आजच्या कारवाईत चालकाकडे रॉयल्टी नसल्याने त्याच्याविरुद्ध सेवाग्राम पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला. यापुढेही अशीच कारवाई सुरु राहणार आहे.
- सुरेश बगळे, उपविभागीय अधिकारी, वर्धा.