शहीद स्मारकाची उपेक्षा
By Admin | Updated: August 9, 2015 02:07 IST2015-08-09T02:07:11+5:302015-08-09T02:07:11+5:30
१९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात १४ आॅगस्ट रोजी जुलमी इंग्रजी प्रशासनाने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या केशव बळीराम बोंगीरवार..

शहीद स्मारकाची उपेक्षा
खरांगणा : १९४२ च्या स्वातंत्र्य लढ्यात १४ आॅगस्ट रोजी जुलमी इंग्रजी प्रशासनाने केलेल्या गोळीबारात शहीद झालेल्या केशव बळीराम बोंगीरवार यांच्या स्मृती तेवत राहाव्या व जनतेला स्वातंत्र्य आंदोलनाची धग कायमस्वरूपी जाणवत राहावी या उद्देशाने बॅरीस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील शहिदांच्या नावे स्मारके उभी करण्यात आली. यापैकी एक म्हणजे मोरांगणा येथील शहीद स्मारक होय; पण सध्या या स्मारकाची उपेक्षा होत असल्याचे दिसते.
या स्मारकाची सध्याची स्थिती अत्यंत दुर्दैवी आहे. सिलींग, फरशी, प्लास्टर जागोजागी उखडले आहे. कुंपण भिंत, गेट पालथे झाले आहे. खांब वाकले आहे. छतावरील सिमेंटच्या शिटा फुटलेल्या आहेत. इलेक्ट्रीक फिटींग लायटींग अस्तित्वातच राहिली नाही, अशी केवीलवानी अवस्था स्मारकाची झाली आहे. स्मारकाचे बांधकाम झाल्यानंतर शासनाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देखभालीकरिता इतर स्मारकांप्रमाणे जिल्हा परिषदेकडे पर्यायाने पंचायत समितीला हस्तांतरित केले. ग्रामपंचायतीकडून देखभाल दुरूस्ती सुरू झाली; पण वार्षिक २४०० रुपयांची तुटपुंजी तरतूद शासनाने केल्याने वीज बील, रंगरंगोटी, तुटफुट दुरूस्ती ही कामे ग्रा.पं. करणे शक्य होत नव्हते. शासनाकडे मागणी करूनही निधी देण्यात आला नाही. १५ वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार डॉ. शरद काळे यांच्याकडे कैफियत मांडली असता त्यांनी आपल्या निधीतून दुरूस्ती काम करून घेतले; पण काही वर्षांतच हे स्मारक जीर्ण झाले. महाराष्ट्रातील बहुतेक स्मारकांची ही अवस्था पाहता शासनाने स्मारके नोंदणीकृत सेवाभावी संस्थांना देखभालीकरिता करारपत्रावर दिली. त्यांना किमान १५ हजार रुपये खर्च करण्यासाठी बिज भांडवल म्हणून दिले. त्या अनुषंगाने येथील स्मारकही एका संस्थेस देखभाल दुरूस्तीसाठी दिले. संस्थेने स्मारकाची दुरूस्तीही केली; पण पुन्हा परिस्थिती जैसे थे दिसून येते. स्मारकाची दुरवस्था पाहता ग्रा.पं. ने ताब्यात देण्याची पुन्हा शासनाकडे मागणी केली. स्मारक स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रेरणास्थान म्हणून विकसित करायचे झाल्यास आठ ते दहा लाखांचा खर्च होणे अपेक्षित आहे; पण शासन व लोकप्रतिनिधी दोघांनाही देशासाठी हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्य सेनानींप्रती वास्तूच्या स्वरूपात आदरांजली अर्पण कराविशी वाटत नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.