एक ट्रक गुटखा जाळला तर दुसऱ्या ट्रकमधील मालाची विल्हेवाट
By Admin | Updated: September 10, 2014 23:53 IST2014-09-10T23:53:16+5:302014-09-10T23:53:16+5:30
अन्न सुरक्षा व मानक विभागाच्यावतीने नागपूर विभागात जप्त केलेला गुटखा तंबाखूचे दोन ट्रक येथील डिजी आर्चड या सोयाबीन प्रकल्पात जाळून नष्ट करण्यासाठी आणला; पण एकाच ट्रकमधील

एक ट्रक गुटखा जाळला तर दुसऱ्या ट्रकमधील मालाची विल्हेवाट
हिंगणघाट : अन्न सुरक्षा व मानक विभागाच्यावतीने नागपूर विभागात जप्त केलेला गुटखा तंबाखूचे दोन ट्रक येथील डिजी आर्चड या सोयाबीन प्रकल्पात जाळून नष्ट करण्यासाठी आणला; पण एकाच ट्रकमधील गुटखा तंबाखू या उद्योगाच्या परिसरात जाळण्यात आला़ एका ट्रकमधील गुटखा तंबाखूची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार पूढे आल्याने खळबळ माजली आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोग्यास हानीकारक गुटखा, तंबाखूच्या वापर व विक्रीवर शासनाने बंदी घातली आहे. या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानक विभागाच्या अधिकाऱ्यांनी विदर्भात ठिकठिकाणी जप्तीची मोहीम राबवून प्रचंड प्रमाणात जप्ती केली होती. सदर मालाची किंमत सुमारे ५५ लाख रुपये असल्याचे समजते.
हा माल जाळून नष्ट करण्यासाठी हिंगणघाट येथील वर्धा रोडवर स्थित डि.जी. आर्चड्स या उद्योगाची निवड करण्यात आली. त्यानुसार रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास जप्तीचा ट्रक येथे आणण्यात आला. सदर मालापैकी एका ट्रकमधील काही माल या उद्योगाच्या मागील बाजूला तीन ठिकाणी उघड्यावर जाळण्यात आला. सदर माल जाळून नष्ट करीत असताना कर्मचारी तसेच काही ग्रामस्थांनी काही माल लंपास केला तर दुसऱ्या ट्रकमधील चांगला माल स्थानिक लोकल ट्रकमध्ये भरून रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याची विल्हेवाट लावल्याची माहिती पूढे आली आहे़ आधी पैसे, नंतर माल या तत्वावर मोहता चौकातील एका व्यापाऱ्याला सदर माल विकल्याचीही शहरात जोरदार चर्चा आहे. यात डि.जी. आर्चड्सचे विष्णू व रवींद्र हे दोन अधिकारी गुंतले असल्याची चर्चा आहे़ या प्रकरणाची उच्चस्तरीय तपासणी करणे गरजेचे आहे़ पानठेले व घाऊक व्यापाऱ्यांकडून जप्त गुटखा, तंबाखूमध्येही घोळ केला जात असल्याचेच या प्रकारातून स्पष्ट झाले आहे़(तालुका प्रतिनिधी)