बापरे! पैसे न दिल्याने पतीने प्रस्थापित केले ‘दुसरी’शी प्रेमसंबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 17:54 IST2021-10-07T17:47:11+5:302021-10-07T17:54:04+5:30
माहेरहुन पैसे आणत नाही म्हणून पतीने चक्क दुसऱ्या महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याची घटना वर्धा शहरात उघडकीस आली आहे.

बापरे! पैसे न दिल्याने पतीने प्रस्थापित केले ‘दुसरी’शी प्रेमसंबंध
वर्धा : पत्नीने माहेरून पैसे आणण्यास नकार दिल्याने पतीने ‘दुसरी’शी प्रेमसंबंध प्रस्थापित केल्याची घटना उघडकीस आली आहे. मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळ केल्याप्रकरणी विवाहितेने सासरच्या चौघांविरुद्ध शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
हुंडाविरोधी कायदा अंमलात असतानाही दररोज कित्येक महिला घरगुती हिंसाचाराच्या बळी पडतात. वर्धेतही अशीच एक घटना घडली आहे. लग्न होऊन 'ती' सासरी नांदायला गेली. मात्र, घरच्यांनी काही महिन्यातच तिच्यामागे माहेरहून पैसे आणण्यासाठीचा तगादा लावला. माहेरची परिस्थिती बेताची असल्याने महिलेनी पैसे आणणे शक्य नसल्याचे सांगितले. मात्र, सासरच्यांनी तिला त्रास देणे सुरू केले. इतकेच नव्हे तर तिच्या पतीने दुसऱ्या महिलेशी सुत जुळविले.
शहरातील समतानगर येथील विवाहितेचे भंडारा येथील राहुल गावंडे याच्याशी १० जानेवारी २०२१ मध्ये विवाह पार पडला. मात्र, लग्नाच्या महिनाभरानंतर पती राहुल गावंडे, उषा गावंडे, सिद्धांत गावंडे, दिलीप गावंडे यांनी वाद करून लग्नात दागिने दिले नाही, असे म्हणत मारहाण करायला सुरुवात केली. तसेच माहेरून पैसे न आणल्यास घरात यायचे नाही, असे म्हणाले.
तर, माहेरची परिस्थिती हलाखीची असल्याने विवाहितेने सर्व त्रास सहन केला. पण, पैसे न दिल्याने पती राहुल याने दुसरीशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर, पिडीतेला मानसिक व शारीरिक त्रासही दिला. या परिस्थितीला वैतागून अखेर पिडीतेने याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.