हिंगणघाट जळीत प्रकरण: आरोपीचा जबाब नोंदवला; बचाव पक्षाचे वकील गैरहजर, उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं हजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:31 IST2021-05-20T18:30:58+5:302021-05-20T18:31:37+5:30
जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी बयान नोंदविण्याकरिता न्यायालयात सकाळी ११:०० वाजता हजर करण्यात आले.

हिंगणघाट जळीत प्रकरण: आरोपीचा जबाब नोंदवला; बचाव पक्षाचे वकील गैरहजर, उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनं हजर
हिंगणघाट( वर्धा) - जळीतकांड प्रकरणातील मुख्य आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला गुरुवारी बयान नोंदविण्याकरिता न्यायालयात सकाळी ११:०० वाजता हजर करण्यात आले. त्यावेळी बचाव पक्षाचे वकील अँड. भुपेन्द्र सोने हे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात गैरहजर असल्याने त्याचे सहकारी वकील अँड. सुदीप मेश्राम हे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर.एन.माजगावकर यांच्या समोर बयान नोंद तपासणीचे कामकाजात आरोपीचे वतीने सहभागी झाले. तर शासकीय विधीतज्ञ अँड. उज्वल निकम हे व्हिडिओ कॉफरन्सिंग द्वारे मुंबई वरुन सहभागी झाले होते.
ह्या प्रकरणाची सकाळी ११ ते २ वाजेपर्यन्त तब्बल तीन तास कामकाज चालले. यामध्ये आरोपीला आतापर्यंत झालेल्या एकूण २९ साक्षीदारांनी न्यायालयात झालेले बयान, व साक्षीचे कथन सांगितले गेले. त्यावर आरोपी विक्की नगराळे याचे काय म्हणणे आहे हे न्यायालयाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर आरोपीने आतापर्यंत झालेल्या २९ बयान वर नकारार्थी उत्तर देत मला हे मान्य नाही असाच जबाब नोंदविला, त्यावर न्यायालयाने आरोपीला विचारले कि,या प्रकरणातील काही साक्षदार तपासायचे आहे कां? तेव्हां आरोपीचे वतीने अँड.सुदीप मेश्राम यांनी न्यायालयाला सांगितले कि आम्हाला या प्रकरणातील दोन साक्षीदार तपासायचे असून त्यांनी तसा अर्ज सादर करुन साक्षदार क्र. २७ दत्ता शांताराम आगरे आणि क्र. २८ प्रविण पाडुरंग तानवडे या दोघांची फेर तपासणी करण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. या विषयी सरकारी अधिवक्ता उज्वल निकम यांचे मत मांडण्याकरीता अँड. दीपक वैद्य यांनी तो अर्ज स्विकारला त्यावर उद्याला सुनावणी होईल असे न्यायालयाने सांगितले.