रोहणा : गावातील शाळा, आरोग्य केंद्र, महसूल विभाग व विद्युत वितरण कंपनीचे कार्यालय आहेत. पण येथील कार्यालयात कार्यरत अधिकाधिक कर्मचारी व अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे असल्याने नागरिकांच्या समस्या अधिककाळ प्रलंबित असतात. आरोग्य, महसूल, विद्युत यासह अन्य महत्त्वाच्या कार्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना मुख्यलयी राहण्याचे आदेश असताना कर्मचारी या नियमांचे उल्लंघन करतात.सामान्यांना मात्र याचा त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना अडचणी सोडवितांना कार्यालयात वारंवार हेलपाटा माराव्या लागतात. सध्या कपाशी व रब्बीतील गहू, चणा या पिकांना ओलिताची गरज आहे. मात्र विद्युत पुरवठ्याअभावी ते शक्य होत नाही. कधी पुरवठा अनियमित असणे, दोन फेजची लाईन असणे तर कधी विद्युत खांबावरील बिघाड याबाबत तक्रारी असतात. या तक्रारींचे समाधान होण्यासाठी अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी असल्यास नागरिक या समस्या तातडीने सोडवू शकतात. वीज वितरण विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने तक्रारकर्त्यांना कर्मचारी येण्याची वाट पहावी लागते. यात वेळेचा अपव्यय होतो. रोहणा येथील विद्युत वितरण केंद्रातील कनिष्ठ अभियंताची बदली झाल्याने येथे रोहणा केंद्राचा अतिरिक्त प्रभार दिला आहे. त्यांना नियोजित ठिकाणचे काम सांभाळून रोहणा केंद्राला वेळ द्यावा लागतो. याचा परिणाम इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवरही होत आहे. मुख्यालयी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतो. सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहुन सामान्य जनतेच्या तक्रारींना योग्य न्याय द्यावा, अशी गावकऱ्यांची मागणी आहे.(वार्ताहर)
कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे वावडे
By admin | Updated: December 15, 2014 23:06 IST