अपंगांची जि.प.वर धडक
By Admin | Updated: December 9, 2015 02:23 IST2015-12-09T02:23:11+5:302015-12-09T02:23:11+5:30
प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर आरती, धरणे आंदोलन केले.

अपंगांची जि.प.वर धडक
विविध मागण्या प्रलंबित : सीईओंच्या आश्वासनानंतर आंदोलक शांत
वर्धा : प्रलंबित मागण्यांसाठी प्रहार अपंग बेरोजगार व कर्मचारी संघटनेने मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर आरती, धरणे आंदोलन केले. अपंगांचा मोर्चा धडकताच पोलिसांनी दोन्ही गेट बंद केले. यामुळे तणाव निर्माण झाला. अखेर बाळा जगताप, हनुमंत झोटींग यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना जि.प. च्या आवारात सोडण्यात आले. यानंतर प्रथम उपमुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी माघार घेतली नाही. सायंकाळी ५ वाजता पुन्हा सीईओ संजय मिना यांनी आंदोलकांची भेट घेत आश्वासन दिल्याने आंदोलनाची सांगता झाली.
अपंगांच्या प्रलंबित मागण्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांकडील तीन टक्के निधीकरिता २७ फेबु्रवारी २०१५ रोजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. यात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांत जिल्हा परिषद तसेच ग्रा.पं. मधील तीन टक्के निधी, तीन टक्के घरकूल, तीन टक्के गाळे वाटप करण्यात येईल, अशी लेखी ग्वाही दिली होती. तसे न झाल्यास संबंधित ग्रा.पं.वर कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद केले होते; पण ग्रा.पं. तर दूरच जि.प. मध्ये अडकून असलेला १ कोटी ६९ लाख रुपयांचा व इतरही योजनेचा लाभ अंपगांना देण्यात आलेला नाही. यामुळे अपंगांमध्ये असंतोष होता. मंगळवारी दुपारी १ वाजता जिल्हा परिषदेवर धडकलेल्या मोर्चाने हा संताप व्यक्त केला.
आंदोलक अपंगांनी ग्रा.पं. ने किती खर्च केला, तो केला नसल्यास त्यावर काय कार्यवाही केली, आपल्या कार्यालयातून खर्च होणाऱ्या निधीचे काय झाले व संबंधितांवर काय कार्यवाही करण्यात आली, याची माहिती देण्याचा हेका धरला. मोर्चा धकडल्यानंतर प्रथम उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार, जि.प. समाज कल्याण अधिकारी रामटेके यांनी आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला; पण सीईओंशी बोलायचे आहे, त्यांनी आश्वासन दिले होते, अशी मागणी करण्यात आली. यानंतर जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मिना यांच्याशी चर्चा झाली.
यात १६ आणि २४ नोव्हेंबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेला कुठलेही अधिकार नाही. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत समिती स्थापन करून त्या समितीला निर्णय घ्यावयाचा आहे, असे सांगितले; पण आंदोलक ही बाब ऐकण्यास तयार नव्हते. यावरून आंदोलकांनी पालकमंत्र्यांना बोलवा, असा हेका धरीत आंदोलन सुरू ठेवले.
सायंकाळी ५ वाजेपर्यंत आंदोलक जि.प.च्या आवारात व आंदोन्लन मंडपातच होते. जि.प. सीईओ मिना यांनी पुन्हा सायंकाळी ५ वाजता आंदोलकांची भेट घेत त्यांना समजाविले. शिवाय पाठपुरावा करून समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. मोर्चा व ठिय्या आंदोलनात सुमारे २०० वर अपंग महिला-पुरूष सहभागी झाले होते.(कार्यालय प्रतिनिधी)
अनुचित प्रकार टळला
जिल्हा परिषदेवर मोर्चा येत असल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम.पी. बुराडे, एएसआय गणेश इंगोले व पोलीस कर्मचाऱ्यांनी आंदोलकांना थोपविण्याचा प्रयत्न केला. यात काही काळ तणावही होता; पण सामंजस्याने घेतल्याने अनुचित प्रकार घडला नाही.
भजने व धुपारणेही
मोर्चात सहभागी अपंगांनी सोबत धुपारणे, आरतीचे ताट, हार आणले होते; पण प्रथम जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने आरती केली नाही. यावेळी भजनांतून अधिकारी, पालकमंत्री यांचा उद्घोष मात्र करण्यात आला.