झाडावर चढल्याने बचावला गुराखी
By Admin | Updated: September 11, 2014 23:45 IST2014-09-11T23:45:20+5:302014-09-11T23:45:20+5:30
गुरे चारत असलेल्या गुराखाच्या अंगावर दुपारी १२ च्या सुमारास अस्वली धावल्या. जीव वाचविण्याकरिता सदर गुराखी झाडावर चढला़ हे पाहून अस्वलांनी चक्क झाडाखालीच ठिय्या मांडला़ रात्री ९ वाजता

झाडावर चढल्याने बचावला गुराखी
नऊ तासांनी झाली सुटका : अस्वलाचे पिलांसह झाडाखाली ठाण
तळेगाव (श्या.पंत.) : गुरे चारत असलेल्या गुराखाच्या अंगावर दुपारी १२ च्या सुमारास अस्वली धावल्या. जीव वाचविण्याकरिता सदर गुराखी झाडावर चढला़ हे पाहून अस्वलांनी चक्क झाडाखालीच ठिय्या मांडला़ रात्री ९ वाजता ग्रामस्थ व वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून अस्वलींना पिटाळून लावले़ यामुळे तब्बल ९ तासांनी गुराख्याची झाडावरून सुटका होऊ शकली़ ही घटना मंगळवारी तळेगाव वनक्षेत्रातील पांजरा शिवारात घडली.
नऊ तासानंतर सुटका झालेल्या गुराख्याचे नाव अशोक नेहारे असे असून तो आर्वी तालुक्यातील वर्धमनेरी या गावचा रहिवासी आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास तो गुरे घेऊन पांजरा जंगलात चारण्याकरिता गेला होता. त्या भागात गत काही महिन्यांपासून अस्वलांसह अन्य हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ सुरू असल्याची चर्चा होती. त्याकडे कुणीही लक्ष दिले नव्हते़ या भागात गुरे चारण्यावर बंदी आहे. असे असताना अशोक सकाळी ९ च्या सुमारास घनदाट जंगलात पोहोचला. दरम्यान, दोन मोठ्या अस्वली व त्यांचे दोन बछडे त्याच्या मागे लागले. काय करावे कळत नसल्याने त्याने उंच झाडावर चढणे पसंत केले. काही वेळाने अस्वली निघून जातील, असे त्याला वाटले; पण अस्वलाने बछड्यांसह झाडाखाली तळ ठोकला.
यामुळे अशोकने जवळ असलेल्या मोबाईलवरून घडलेला प्रकार गावातील काही व्यक्तींना कळविला. सोबतच खानवाडी येथील वनसमितीचे अध्यक्ष गुणवंत सालोकार यांनाही याबाबत माहिती दिली़ यानंतर सदर घटना तळेगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी वनीकर यांना सांगताच ते वन कर्मचारी इंगळे तसेच वर्धमनेरी व खाणवाडी येथील ग्रामस्थांसह रात्री ८ वाजताच्या सुमारास पांजरा जंगलात पोहोचले़ अशोक कोणत्या झाडावर बसून आहे, हे कळत नव्हते. शेवटी अशोकच्या भ्रमणध्वनीवर ग्रामस्थांनी संपर्क साधला. जंगलात प्रचंड आरडाओरड करण्यात आली. शेवटी अशोकचा पत्ता लागला. नऊ तास उलटले असतानाही अस्वली बछड्यांसह झाडाखालीच बसून होत्या. ग्रामस्थांना अस्वलींना हुसकावून लावले़ यानंतर अशोक झाडावरून खाली उतरला़ रात्री ९ वाजता अखेर त्याची सुटका झाली आणि जंगलातील थरार संपला.(वार्ताहर)
मोबाईल नसता तर...
जंगलात गुरे चारण्याकरिता गेलेल्या अशोककडे मोबाईल नसता तर त्याला मदत मिळाली असती काय, त्याच्यासोबत घडलेली घटना ग्रामस्थांसह वन अधिकाऱ्यांना कळली असती काय, असे एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अशोककडे भ्रमणध्वनी संच असल्याने त्याला जीवनदान मिळाले़ जंगलालगतच्या शेत मालक व मजुरांमध्ये यामुळे भीती पसरली आहे़