‘ग्रीन आर्मी’ने गाठला २४ हजार सदस्यांचा पल्ला
By Admin | Updated: May 4, 2017 00:40 IST2017-05-04T00:40:26+5:302017-05-04T00:40:26+5:30
जगावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट उभे ठाकल्याने पर्यावरणपूरक चळवळींचे महत्त्व वाढले आहे.

‘ग्रीन आर्मी’ने गाठला २४ हजार सदस्यांचा पल्ला
वन संवर्धनाचा उपक्रम : नोंदणीत सेलू तालुका अव्वल
प्रशांत हेलोंडे वर्धा
जगावर ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट उभे ठाकल्याने पर्यावरणपूरक चळवळींचे महत्त्व वाढले आहे. काही वर्षांपर्यंत केवळ सामाजिक संघटनांचा पुढाकार असलेल्या बहुतांश चळवळी आता शासनाने सक्तीच्या केल्या जात आहेत. यातच ‘ग्रीन आर्मी’चे उद्दीष्ट वन विभागाला देण्यात आले आहे. वन विभाग या उद्दिष्ट पूर्तीसाठी सरसावला असून वर्धा जिल्ह्याने २४ हजार सदस्य संख्येचा पल्ला गाठला आहे.
वन विभागाकडून राष्ट्रीय हरित सेना हा उपक्रम अनेक वर्षांपासून राबविला जातो; पण त्याला विशेष महत्त्व दिले जात नव्हते. हा उपक्रम शाळांपूरताच मर्यादित झाला होता. आता वाढते प्रदूषण, पाणीटंचाई, वृक्षांची कत्तल व ग्लोबल वॉर्मिंगचा धोका लक्षात घेता उपक्रमांची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आता ग्रीन आर्मीमध्ये कुणालाही सदस्य होता येणार आहे. यामुळे ही फौज वाढवून पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.
वर्धा जिल्ह्यात वन विभागाला २४ हजार ७९४ सदस्यांची नोंद करता आली आहे. यात आर्वी तालुक्यात २ हजार ५१४, आष्टी २ हजार ९१५, देवळी ३३५, हिंगणघाट २ हजार १२३, कारंजा ४ हजार ९२८, समुद्रपूर ३ हजार २४४, सेलू ५ हजार ४९८ तर वर्धा तालुक्यात ३ हजार २३७ सदस्यांची नोंद करण्यात आली आहे.
पर्यावरण संरक्षणासह माणसाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यात जंगलाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे वनांची निर्मिती, वनसंरक्षण व संवर्धन या तीनही बाबी महत्त्वाच्या असल्याने त्या दृष्टीने वन विभागाच्या कामाची दिशा ठरविण्यात आली आहे. राष्ट्रीय व राज्य वन धोरणानुसार राज्याचे ३३ टक्के भौगोलिक क्षेत्र वृक्षाच्छादित असणे गरजेचे आहे. भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्त्वातील कलम ४८ अ नुसार वन्यजीव पर्यावरण व इतर नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षण व संवर्धनाची जबाबदारी संबंधित राज्यावर सोपविण्यात आली आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाला वन व वन्यजीवांचे संरक्षण, संवर्धनाची संधी उपलब्ध करून देणे आणि लोकसहभाग मिळविण्यासाठी ग्रीन आर्मी सशक्त करण्याचे उद्दिष्ट वन विभागाला देण्यात आलेले आहे.
कोण होऊ शकतो सहभागी
राज्यातील प्रत्येक नागरिक वैयक्तिकरित्या महाराष्ट्र हरित सेनेचा सदस्य होऊ शकतो. यात शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, शासकीय कर्मचारी, अधिकारी (कार्यरत तसेच सेवानिवृत्त), खासगी संस्थांचे कर्मचारी, अधिकारी, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक यापैकी कुणालाही ग्रीन आर्मीचे सदस्यत्व स्वीकारता येऊ शकते.
पर्यावरण संवर्धनासाठी सदस्यांकडून अपेक्षा
ग्रीन आर्मीच्या सदस्य, स्वयंसेवकाने वन विभागामार्फत आयोजित कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेणे अपेक्षित आहे. यात वृक्ष लागवड, वृक्ष दिंडी, वन संरक्षणासाठी सामूहिक गस्त, वणव्याच्या हंगामात प्रत्यक्ष सहभाग, वन्यप्राणी प्रगणना, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन, जागतिक वन दिन यासह वनमहोत्सव कालावधीत राबविल्या जाणारे उपक्रम, वन्यजीव सप्ताहातील वन्यप्राणी संरक्षणाबाबत सर्व उपक्रमांमध्ये सहभाग अपेक्षित आहे. पर्यावरण संवर्धनासाठी प्रभात फेरी, पथनाट्य, सायकल रॅली आदी जनजागृती कार्यक्रमांत सहभाग तथा त्यांच्या क्षेत्रातील वन, वन्यजीव, निसर्ग व पर्यावरणाशी निगडीत कार्यक्रम, उपक्रमांमध्ये सहभागाची अपेक्षा आहे
सामूहिक नोंदणीचाही पर्याय
सामूहिक स्वरुपातही सदस्य नोंदणी करता येते. यात निमशासकीय संस्था, अशासकीय संस्था, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था आदींना महाराष्ट्र हरित सेनेचे सदस्य होता येते. यासाठीही संकेतस्थळामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे.