टाकरखेड : देशभर स्वच्छ भारत मिशन राबविले जात आहे; पण तीर्थक्षेत्र टाकरखेड यास अपवाद ठरत आहे़ ग्रा़पं़ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे गावात स्वच्छतेचा बोजवारा वाजला आहे़ ग्रा़पं़ प्रशासनाला स्वच्छतेचा विसरच पडल्याचे गावातील एकूण चित्रावरून दिसते़ यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़ गावात ऐन रस्त्यावर शेणाचे उकिरडे साचले आहे़ गावाचा दर्शनी भाग हागणदारीयुक्त असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे़ या अस्वच्छतेचा परिणाम ग्रामस्थांच्या आरोग्यावर होऊ लागला आहे़ संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी तीर्थक्षेत्राच्या अस्वच्छतेकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ श्री संत लहानुजी महाराजांच्या पावनभूमीत दर्शनास राज्याच्या कानाकोपऱ्यातून दैनंदिन भाविकांची ये-जा सुरू असते; पण येथे येताना गावाच्या दर्शनी भागात नाकावर हात वा रूमाल ठेवून प्रवेश करावा लागतो, ही या गोदरीयुक्त गावाची शोकांतिका आहे़आदर्श व नावलौकिक असलेल्या गावात तीर्थक्षेत्र विकास निधीतून आमदार, माजी आमदार, माजी जि़प़ सदस्य, माजी पं़स़ उपसभापती यांच्या प्रयत्नाने सुुंदर व चांगल्या दर्जाचे सिमेंट काँक्रीटचे रस्ते बनविण्यात आले आहेत; पण आता याच रस्त्यावर ऐन रहदारीच्या ठिकाणी वस्तीमध्ये अनेकांनी शेणाचे उकिरडे तयार केले आहेत़ शिवाय जनावरांचे गोठेही रस्त्यावरच उभारले आहेत़ यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाली आहे़ या प्रकारामुळे शाळेचा परिसरही घाणीच्या साम्राज्यात हरवला आहे़ ग्रामपंचायत प्रशासनाने गावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने काही नागरिकांचा मनमानी कारभार सुरू आहे़ दिवसेंदिवस रस्त्यावर घाण वाढत आहे़ सोबतच पऱ्हाट्याचे ढिगारे आणि घराचे ओटे समोर करून अतिक्रमणही करण्यात आले आहे़ यामुळे हे गाव आहे की गोठाण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ गत अनेक वर्षांपासून या गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले नाही़ गावातील विविध समित्या केवळ कागदोपत्रीच दाखविण्यात येत असल्याचे दिसते़ देशात सर्वत्र स्वच्छेतेची शपथ घेऊन अभियान राबविले जात आहे; पण येथील ग्रामपंचायत प्रशासनाला स्वच्छतेचा विसर पडल्याचेच दिसून येत आहे़ गावातील घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ चिमुकल्यांसह वृद्धांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे़ गावातील घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)
ग्रामपंचायतीला पडला स्वच्छतेचा विसर
By admin | Updated: December 13, 2014 02:13 IST