मतदार जनजागृतीसाठी प्रशासनही आघाडीवर

By Admin | Updated: September 25, 2014 23:28 IST2014-09-25T23:28:27+5:302014-09-25T23:28:27+5:30

लोकशाही बळकट करण्याकरिता संपूर्ण मतदारांनी मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावणे गरजेचे आहे; पण आजपर्यंत देशात कुठेही १०० टक्के मतदान झालेले नाही़ यामुळे निवडणुकीच्या निकालांवर मोठा

Governance is also responsible for the voter awareness | मतदार जनजागृतीसाठी प्रशासनही आघाडीवर

मतदार जनजागृतीसाठी प्रशासनही आघाडीवर

प्रशांत हेलोंडे - वर्धा
लोकशाही बळकट करण्याकरिता संपूर्ण मतदारांनी मतदानाचा घटनादत्त अधिकार बजावणे गरजेचे आहे; पण आजपर्यंत देशात कुठेही १०० टक्के मतदान झालेले नाही़ यामुळे निवडणुकीच्या निकालांवर मोठा प्रभाव पडत असून असे मतदान कुण्या एका पक्षाच्या पत्थ्यावर पडत असल्याचा आजवरचा अनुभव आहे़ यामुळे केंद्रीय तसेच राज्य निवडणूक आयोगाच्यावतीने मतदार जनजागृती अभियान तसेच मतदार नोंदणी अभियान राबविण्याची सक्ती केली जाते़ असे असले तरी गत कित्येक वर्षांपासून मतदानाची टक्केवारी ९० च्या वर गेल्याचे ऐकीवात नाही़
वर्धा विधानसभा मतदार संघात चार मतदार संघ असून सुमारे १० लाख ६ हजार २२ मतदार आहेत़ यात वर्धा विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख ८१ हजार ६, आर्वीमध्ये २ लाख ४७ हजार ५६, देवळीमध्ये २ लाख ४६ हजार ८६३ तर हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये २ लाख ५९ हजार ५७८ मतदार आहेत़ यामुळे पुरूषांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाणही जवळपास ९० टक्के आहे़ शिवाय ३० हजारांवर नवीन मतदारांची जिल्ह्यात नोंदणी करण्यात आलेली आहे़ सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, यासाठी निवडणूक आयोग आणि निवडणूक विभागाद्वारे कित्येक वर्षांपासून सातत्याने प्रयत्न होत आहेत; पण या प्रयत्नांना अद्यापही यश आल्याचे दिसत नाही़
२००९ च्या निवडणुकीत जिल्हाभर जनजागृती कार्यक्रम राबविल्यानंतरही सरासरी ६५ टक्के मतदान झाले़ २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही मतदानाची टक्केवारी गाठता आलेली नाही़ असे असले तरी या निवडणुकीनंतर सत्ताबदल अनुभवता आला़ मतदानाची टक्केवारी वाढली तर राजकारणात उलथापालथ होते, हे सर्वविदीत आहे; पण प्रयत्न करूनही १०० टक्के मतदान होत नसल्याचे सत्य नाकारता येत नाही़
लोकसभा २०१४ च्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली़ शिवाय जागोजागी पथनाट्यातून मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले़ घरोघरी बुथ लेव्हल आॅफीसरच्या माध्यमातून मतदार चिठ्ठ्या पोहोचवून मतदान करण्याचा आग्रह धरण्यात आला; पण त्याचा फारसा उपयोग झाल्याचे दिसले नाही़
आता २०१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठीही राज्य निवडणूक आयोग, निवडणूक विभाग व संपूर्ण प्रशासनाने मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता मतदार जनजागृती अभियान सुरू केले आहे़ यात जागोजागी मोठे फलक लावण्यात आले असून मतदानाचा हक्क बजावण्याचा आग्रह धरण्यात आला आहे़ वर्धा शहरात जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सामान्य रुग्णालय तसेच निवडणूक विभागाच्यावतीने ‘पोस्टर वॉर’च सुरू करण्यात आले आहे़ लोकसभा निवडणुकांपूर्वीही वर्धा शहरासह संपूर्ण लोकसभा मतदार संघात अशा प्रकारची जनजागृती करण्यात आली होती़ या कार्यात राज्य शासनाच्या अखत्यारितील सर्वच विभागांनाही जुंपण्यात आले होते; पण फार फरक पडला नव्हता़ आता किमान विधानसभा निवडणुकीत तरी १०० टक्के मतदान व्हावे, यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात आहेत़ मतदार जनजागृती कार्यक्रमांतर्गत मार्गदर्शन कार्यशाळाही घेतली जात आहे़ शिवाय पोस्टर, सह्यांची मोहीम आदी अनेक माध्यमांतून जनजागृतीचे प्रयत्न सुरू आहेत़ विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनही मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे़
मतदारांना जागृत करून मतदानाच्या टक्केवारीचे उद्दीष्ट गाठता यावे, यासाठी निवडणूक विभागासह प्रत्येक शासकीय कार्यालय प्रयत्न करीत आहे़ यासाठी शहरात जागोजागी लावलेले फलक जागृती युद्ध सुरू असल्याचा भास निर्माण करणारेच ठरत आहे़ याचा मतदारांवर किती परिणाम होतो, हे मात्र पाहण्याजोगे राहणार आहे़ चारही विधानसभा मतदार संघात अडीच लाखांवर मतदार असून १०० टक्के मतदान झाल्यास चित्र पालटण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतात़ जनजागृती मोहिमेला यंदा किती यश येते, हे दि़ १५ नंतरच कळेल!

Web Title: Governance is also responsible for the voter awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.