बसण्यासाठी जागा द्या!
By Admin | Updated: July 23, 2015 02:06 IST2015-07-23T02:06:00+5:302015-07-23T02:06:00+5:30
मुक्ताबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याकरिता जागाच नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय ...

बसण्यासाठी जागा द्या!
मागणी : विद्यार्थी पोहोचले गटशिक्षणाधिकाऱ्याच्या दालनात
समुद्रपूर : मुक्ताबाई विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शाळेत बसण्याकरिता जागाच नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांनी पंचायत समिती कार्यालय तसेच तहसील कार्यालयावर मंगळवारी मोर्चा काढला. गटशिक्षणाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देत शाळेत विद्यार्थ्यांना बसण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी लावून धरली.
पुलगाव येथील रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्थेच्यावतीने समुद्रपूर येथे मुक्ताबाई विद्यालय चालविले जाते. पूर्वी ही शाळा प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशिय शिक्षण संस्था वर्धाद्वारा चालविली जात होती. त्या संस्थेचीच जागा असल्याने तेथील खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग चालविले जात. पुढील हालचालीत प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेने या शाळेच्या संचालनाने हक्क पुलगाव येथील रवींद्रनाथ टागोर शिक्षण संस्थेला दिले. परंतु ही शाळा प्रभू विश्वकर्मा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या इमारतीमध्येच सुरू होती. पुढील हालचालीत ही इमारत तसेच रिक्त जागा प्रभू विश्वकर्मा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष वंसत वांढरे यांनी गोल्हर इंडस्ट्रीजला विकली. त्यामुळे त्यांनी शाळेची इमारत खाली करून घेतली. दरम्यानच्या काळात मुक्ताबाई विद्यालयाच्यावतीने अन्यत्र चार वर्गखोल्याचे बांधकाम केले. यानंतर येथे वर्ग भरविणे सुरू केले. या वर्षीचे शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर ५५० विद्यार्थ्यांना बसविण्याकरिता फक्त चार खोल्या उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली. विद्यार्थ्यांना त्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती असल्याने शाळेच्या कार्यालयाकरिता खोलीच उपलब्ध नाही. त्यामुळे शिक्षक व मुख्याध्यापक बाहेर व्हरांड्यामध्ये बसतात. याबाबत विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापकाच्या माध्यमातून संस्थेकडे तक्रार पाठविली होती. पण त्याकडे दुर्लक्ष झाले. विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी लक्ष वेधण्याकरिता येथील कार्यकर्ते मनीष गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप डगवार, कुळकर्णी महाराज यांच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांच्या सहभागाने मोर्चा काढला. पंचायत समितीला गटशिक्षणाधिकारी नासीर अहमद यांना व तहसील कार्यालयामध्ये नायब तहसीलदार सुरेंद्र दांडेकर यांना निवेदन देण्यात आले.
याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल सादर करून, या शाळेची मान्यता काढून घेण्याबाबत शिफारस करणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी नासीर अहमद यांनी सांगितले. तीन वर्ग एकाच खोलीत बसविले जातात. त्यांना एकच शिक्षक शिकवितात, इतर शिक्षक बाहेर बसून असतात हा प्रकार या माध्यमातून पुढे आला. यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून हा प्रश्न निकाली काढणे महत्त्वाचे ठरत आहे. याबाबी शिक्षणाधिकाऱ्यांना कळविण्यात येणार असल्याचे संबंधितांनी यावेळी सांगितले.(तालुका प्रतिनिधी)