रस्ते घेताहेत मोकळा श्वास
By Admin | Updated: April 5, 2015 02:01 IST2015-04-05T02:01:14+5:302015-04-05T02:01:14+5:30
सध्या शहरातील काही रस्ते मोकळे, विस्तारलेले दिसत आहेत़ हे रस्ते खरच एवढे रूंद होते काय, यावर आता कुठे विश्वास बसायला लागला आहे.

रस्ते घेताहेत मोकळा श्वास
हेमंत चंदनखेडे हिंगणघाट
सध्या शहरातील काही रस्ते मोकळे, विस्तारलेले दिसत आहेत़ हे रस्ते खरच एवढे रूंद होते काय, यावर आता कुठे विश्वास बसायला लागला आहे. अतिक्रमण हटविल्याने रस्त्यालगतचा भाग मोकळा झाला आणि वाहतुकीला जागा उपलब्ध झाली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे शहरातील रस्ते मोकळा श्वास घेत आहे़ महानगराप्रमाणे हे रस्ते रूंद दिसत असले तरी हे क्षणिक तर राहणार नाही ना, अशी शंकाही व्यक्त होत आहे़
शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली़ यात अतिक्रमण काढल्यानंतर त्यावर कुठलीही प्रतिबंधात्मक योजना, आराखडा नगर परिषदेने तयार केला नाही़ यामुळे नेहमीप्रमाणे यंदाही तेच घडणार असल्याची शक्यता बळावली आहे. नियमित देखरेख करणाऱ्या दक्षता पथकासारखी यंत्रणा कार्यान्वित करून यावर उपाययोजना करणे गरजेचे होते; पण तसे काहीही केल्याचे दिसून येत नाही़ शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडावी, विद्रुपीकरण कमी व्हावे, अरूंद रस्त्यांचे रूंदीकरण करून शहरातील वाहतूक व्यवस्थेला होणारा अडथळा दूर करता यावे, यासाठी म्हणत ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली; पण प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या नाही़ यामुळे दरवेळप्रमाणे यावेळीही गाजावाजाच मोठा झाला. अतिक्रमणात अनेकांचा रोजगार हिरावला गेला, दुकानांची मोडतोड झाली, अनेकांच्या संपत्तीचे नुकसान झाले़ पालिकेच्या नावावर मोहिमेचे यश जमा झाले; पण त्यापासून जनतेला काय फायदा व किती नुकसान झाले, हे तपासणे गरजेचे झाले आहे़ २४ ते २६ मार्च दरम्यान शहरात अतिक्रमणाची हटविण्याची मोहीम चालली. तीनच दिवसांचे पोलीस संरक्षण असल्याने पूढे मोहीम थांबली; पण ते सांणग्याचे धारिष्ठ्य पालिकेने दाखविले नाही़ यामुळे सारेच संभ्रमात होते. ही मोहीम मधेच थांबल्याने चर्चेला उधान आल्याचे दिसते़
अतिक्रमण हटविल्यानंतर पुढे काय?, नागरिक संभ्रमात
२० ते २५ वर्षे जुने अतिक्रमण हटविले गेले असून शहरातील एक हजार लोकांची आस्थापने प्रभावित झाली़ रोजगार गेला, आर्थिक नुकसान झाले. कुटुंब कसे चालवावे या विंवचनेत दिवस जात असून पालिकेची कोणतीही योजना त्यांच्या मदतीला दिसत नाही़ शहरात अनेक ठिकाणी खुल्या जागा आहे़ तेथे झोन निर्माण करून त्यांना जागा उपलब्ध करता येते. वाहतुकीला बाधा पोहचणार नाही, अशा जागा निवडून नियोजन, आराखडा व थोडी तरतूद करून ही गरज पूर्ण होऊ शकते़ पालिकेचे दुकान गाळे बांधून तयार आहे; पण त्याचे वाटप झाले नाही. तेही यासाठी विचारात घेण्यासारखे निश्चित आहे; पण योजना नसल्याने संभ्रम निर्माण झाला आहे़
शहरातील विकास कार्ये
शहरात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे सुरू आहे. पालिकेच्यावतीने विविध शासकीय योजनेंतर्गत कोट्यवधींची कामे होत आहे़ यात शहरातील प्रमुख रस्त्यांचे बांधकाम, रूंदीकरण, डांबरीकरण, दुतर्फा नाल्यांचे बांधकाम आदींचा समावेश आहे़ गत दहा वर्षांत प्रथमच विकास कामे दिसू लागलीत़ वाढीव लोकसंख्येनुसार शहर वाहतुकीचे योग्य नियोजन व व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा येथे आहे. पोलीस प्रशासन अपूऱ्या कर्मचाऱ्यांचे कारण देत गत कित्येक वर्षे वेळ काढत आहे. याची ठोस मागणीही दिसून येत नाही़
आठवडी बाजारात वाहतूक समस्या
भाजीबाजार तर आठवडी बाजाराचे मैदान सोडून थेट वाहतुकीच्या रस्त्यावर आला असून तेथे वाहतुकीची गंभीर समस्या उत्पन्न झाली आहे़ जुन्या वस्तीतील नागरिक दररोज तक्रारी घेऊन पालिकेकडे जातात; पण गत एक ते दीड वर्षांपासून त्यांना आश्वासनाशिवाय काही मिळत नाही. दररोज थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ काढली जात असल्याच्या तक्रारी आहेत. नागरिकांनी तक्रार केली असता वाहतूक पोलीस केवळ एक-दोन दिवस येऊन थातूरमातूर कारवाई दाखवून पुन्हा पूढील तक्रार येईपर्यंत गायब होतात. ही तकलादू व्यवस्था किती दिवस चालणार, जनसामान्यांना ठोस कृती मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़
आमचा रस्ता कुठे आहे
जुन्या वस्तीतील नागरिकांना श्रीराम टॉकीज ते अभ्यंकर शाळा या रस्त्याने ये-जा करावी लागते; पण या रस्त्यावर भाजीबाजार आल्याने त्यांना तेथे रस्ताच समस्या बनला आहे. आपली वाहने घरापर्यंत कशी न्यावी, ही समस्या वेळोवेळी निर्माण होत असून त्यांना आमचा रस्ता द्या हो, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या भागातील विद्यमान नगरसेवकाने तर पालिकेला आमचा रस्ता आहे तरी कुठे, असा सवाल केला आहे़ त्याचे उत्तर पालिकेजवळ नाही.