अन्नधान्य योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2015 02:18 IST2015-08-17T02:18:34+5:302015-08-17T02:18:34+5:30
अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रती व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ ...

अन्नधान्य योजनेचा जिल्ह्यात शुभारंभ
पवनार येथे कार्यक्रम : जिल्ह्यातील ५१ हजार ५३७ शेतकऱ्यांना लाभ
वर्धा : अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रती व्यक्ती पाच किलो अन्नधान्याचा पुरवठा करण्याच्या महत्वपूर्ण योजनेचा शुभारंभ पवनार येथे शनिवारी झाला. मातोश्री बहुउद्देशिय सहकारी स्वसत धान्य दुकानातून पवनार येथील शेतकरी श्यामराव इखार यांना सवलतीच्या दरातील गहू दोन रुपये व तांदूळ तीन रुपये किलो दराने देण्यात आले. या योजनेच्या पहिल्या लाभार्थ्यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
पवनार येथील मातोश्री बहुउद्देशिय सहकारी स्वस्त धान्य दुकानाच्या परिसरात आयोजित शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने अन्नधान्य वितरणाच्या योजनेचा शुभारंभ खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, जिल्हाधिकारी आशुतोष सलील, सरपंच राजेश्वर गांडोळे, उपसरपंच जगदीश पेटकर, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई यांच्या उपस्थितीत झाला.
केशरी, एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या धर्तीवर ही योजना असून जिह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या तालुका व स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध आहेत. या योजनेच्या लाभापासून जे शेतकरी अद्याप वंचित आहेत त्यांनी तत्काळ आपली नावे संबंधीत तहसीलदारांकडे द्यावीत व योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी केले. या योजनेपासून कुणीही लाभार्थी शेतकरी वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात.
खासदार तडस म्हणाले की, शेतकऱ्यांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी शेतीबरोबरच जोडधंदा करावा. शेतकऱ्यांसाठी शासन अनेक योजना राबवित आहेत. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. तसेच पर्यटन विकासासाठी सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून पवनार व सेवाग्रामचा विकास करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार डॉ. भोयर यांनी सततची नापिकी, अवेळी पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडला असताना शासनाने शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने प्रति व्यक्ती गहू व तांदुळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय उपलब्ध करून दिला आहे. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी व प्रत्येक गावापर्यंत पोहोचावी, अशी अपेक्षा व्यक्त करतात शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून सरंक्षित सिंचन व विजेचा प्रश्नही सोडविण्यात आला आहे. पवनार येथील विकासासोबतच पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगिन विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी लाभार्थी शेतकरी दिवाकर बोकडे, शंकर साटोने, अंबादास वाटमोडे, शंकर हिंगणकर, बापूराव बोरकर, विनोद बोरकर, कवडूजी बालपांडे यांना सवलतीच्या दरात गहू व तांदुळ वितरीत करण्यात आले.(प्रतिनिधी)