भरधाव ट्रॅव्हल्सने चिमुकलीला चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:19 IST2017-10-14T14:12:36+5:302017-10-14T14:19:23+5:30
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या शिरपूर येथे एका भरधाव ट्रॅव्हल्सने एका शाळकरी मुलीला धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

भरधाव ट्रॅव्हल्सने चिमुकलीला चिरडले
देवळी: वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यात असलेल्या शिरपूर येथे एका भरधाव ट्रॅव्हल्सने एका शाळकरी मुलीला धडक दिल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसची तोडफोड केली व साडेतीन तास रास्ता रोको आंदोलन केले. याप्रकरणी खा. रामदास तडस यांनी मध्यस्थी करून नागरिकांची समजूत काढली.
शनिवारी सकाळी जवळच्याच मंदिरात काकड आरतीसाठी गेलेली ऋणाली गजानन राजूरकर ही ११ वर्षे वयाची मुलगी मंदिरातून घराकडे परत येत असताना, रस्ता क्रॉस करतेवेळी भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅव्हल्स बसने तिला धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की ऋणाली जागीच ठार झाली. यावेळी पुलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे हे आपल्या वाहनाने जात होते. त्यांनी सदर बसचा पाठलाग करून तिला अडवले. तोपर्यंत घटनास्थळी सगळा गाव जमा झाला होता. संतप्त नागरिकांनी बसच्या काचा फोडून नासधूस केली.
या घटना वारंवार होत असल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गतिरोधक लावल्याशिवाय या मुलीचा मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा तिच्या कुटुंबियांनी व नागरिकांनी घेतल्याने तब्बल साडेतीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी स्त्रीपुरुष रस्त्यात विद्युत खांब आडवा टाकून बसून राहिले होते. सुमारे ११ च्या सुमारास गतिरोधकाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांनी या मुलीचा मृतदेह हलवला. रास्ता रोकोमुळे वर्धा व यवतमाळ मार्गावर दोन कि.मी. अंतरापर्यंतची वाहतूक ठप्प झाली होती. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याचेही वृत्त आहे.
याच मार्गावर आतापर्यंत पाच जणांचा बळी गेला आहे. येथे गतिरोधक लावावा अशी मागणी वारंवार होऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा संताप नागरिकात व्यक्त होत होता. ऋणाली पाचव्या वर्गात शिकत होती.