पाच एकरात उत्खनन, अनधिकृत बांधकाम
By Admin | Updated: November 4, 2016 01:43 IST2016-11-04T01:43:25+5:302016-11-04T01:43:25+5:30
नागपूर-अमरावती महामार्ग क्रमांक सहा लगतच्या पाच एकरात अकृषक परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन व अनधिकृत बांधकाम सुरू आहे.

पाच एकरात उत्खनन, अनधिकृत बांधकाम
तक्रारींकडे अधिकाऱ्यांचा कानाडोळा : सर्वच परवानग्या असल्याची शेत धारकाची दर्पोक्ती
कारंजा (घा.) : नागपूर-अमरावती महामार्ग क्रमांक सहा लगतच्या पाच एकरात अकृषक परवानगी न घेता अवैधरित्या उत्खनन व अनधिकृत बांधकाम सुरू आहे. याकडे संबंधित विभागांचे दुर्लक्ष होत असून परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार केली; पण अद्यापही कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही.
शहरापासून दोन किमी अंतरावर महामार्गालगत अमीर अली जाफर मखानी व चौघे यांचे शेत सर्व्हे क्र. ११० मध्ये १.९८ हेक्टर आर अशी सुमारे पाच एकर जागा आहे. सदर शेताची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही. एक महिन्यापासून सर्रास अवैध उत्खनन व बांधकाम सुरू आहे. परवानगी नसताना बांधकाम सुरू असल्याने कारवाई का केली जात नाही, याबाबत नागरिक शंका उपस्थित करीत आहेत. महसूल विभागाच्या परवानगीशिवाय वा सदर शेती परावर्तीत केल्याशिवाय असे औद्योगिक वा रहिवासी बांधकाम करता येत नाही; पण शेतमालकाकडून उद्दामपणे बांधकाम केले जात असल्याचे दिसते. याबाबत संबंधित विभागांकडे चौकशी केली असता सदर बांधकाम अवैध असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले; पण गत दीड महिन्यापासून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
याउलट शेतमालक माझ्याकडे सर्वच परवानग्या आहेत, असे सांगत आहे. असे असले तरी याबाबत अकृषक परवानगी नसल्याचे समोर आले आहे. शिवाय महामार्गालगत बांधकाम सुरू असून महामार्ग प्राधिकरणाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी याकडे जातीने लक्ष देत अवैध उत्खनन व अनधिकृत बांधकाम प्रकरणी कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.(शहर प्रतिनिधी)