वर्धा विधानसभेत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर
By Admin | Updated: September 13, 2014 02:06 IST2014-09-13T02:06:41+5:302014-09-13T02:06:41+5:30
विधानसभा मतदार संघात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर सर्वच मतदान केंद्रांवर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

वर्धा विधानसभेत प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर
वर्धा : विधानसभा मतदार संघात प्रथमच व्हीव्हीपॅटचा वापर सर्वच मतदान केंद्रांवर करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. अशा प्रकारची यंत्रणा राज्यातील १३ मतदारसंघात होणार आहे. व्हीव्हीपॅट म्हणजेच (व्होटर व्हेरीफाईड पेपर आॅडीट ट्रेल) हे छोटे प्रिंटर मतदान यंत्रासोबत राहणार आहे. या प्रिंटरवर मतदान करणाऱ्या व्यक्तीलाच केलेले मतदान दिसेल व मतदान पूर्ण झाल्यावर ही स्लीप एका पेटीम जमा होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन. सोना यांनी दिली.
वर्धा मतदारसंघातील मतदारांना या नव्या पध्दतीने मतदान करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच बटन दाबल्यानंतर आपले मत पेपरवर प्रत्यक्ष बघता येणार आहे. मतदान झाल्यानंतर मतदान योग्य झाल्याची पावती असलेला पेपर मतदान यंत्रासोबतच सीलबंद करून मतमोजणीच्या वेळी ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावरील मोजणी व व्हीव्हीपॅटव्दारे जमा झालेल्या स्लीप यांचीही यावेळी मोजणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगातर्फे करण्यात आली असून, जिल्ह्यातील वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट या चारही विधानसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी आज दिली.
जिल्हाधिकारी एन. नवीन सोना यांनी निवडणुकीची घोषणा होताच विधानसभा निवडणुकीसंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेवून आढावा घेतला. विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील निवडणुकी संदर्भात करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेण्यात येणार आहे. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, उपविभागीय महसूल अधिकारी वैभव नावडकर, उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास माजरीकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)