अखेर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांमध्ये संचारला उत्साह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST2021-12-02T05:00:00+5:302021-12-02T05:00:46+5:30
शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. अखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले.

अखेर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळांमध्ये संचारला उत्साह
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोनाच्या महामारीमुळे तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शासनाच्या निर्देशानुसार आजपासून ग्रामीण भागातील पहिली ते चौथी तर शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील पहिली ते चौथीपर्यंतच्या १ हजार १५९ शाळा सुरू झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. त्यामुळे चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा परिसरामध्ये उत्साह संचारला होता.
शैक्षणिक भवितव्याचा विचार करून शासनाने शाळा सुरू कराव्यात अशी विद्यार्थी, पालक यांच्यासह शिक्षकांचीही इच्छा होती. ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी आणि शहरी भागातील आठवी ते बारावीचे वर्ग पूर्वीच सुरू झाले. परंतु उर्वरित वर्गांना शासनाकडून परवानगी मिळाली नव्हती. अखेर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागातील पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग १ डिसेंबरपासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले. त्यानुसार पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ९७१ तर शहरी भागातील १८८ पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात. यात ग्रामीण भागात २४ हजार ४१२ तर शहरी भागात १२ हजार ८०६ विद्यार्थी उपस्थित झाले होते. त्यामुळे तब्बल पावणे दोन वर्षांनंतर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी गजबजून गेला होता. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार शाळांनी व्यवस्था केली आहे. त्यासोबतच आज पहिल्या दिवशी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व चॉकलेट देऊन स्वागत केले.
तीन दिवसात अहवाल सादर करा
शासनाच्या परिपत्रकातील मार्गदर्शन सूचनांनुसार शाळा सुरु करण्यासंदर्भातील पूर्व तयारीबाबत पडताळणी करुन खात्री करण्याचे निर्देष जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यानुसार प्राथमिकचे शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे यांनी सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठविले असून सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख व समग्र शिक्षा अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांनी गटातील सर्व शाळांची पडताळणी करण्याचे नियोजन करुन १०० टक्के शाळांच्या पडताळणीसोबतच सर्व शाळांचा अहवाल प्रपत्रानुसार संकलित करुन तीन दिवसात अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.