...अन् वडिलानेच केला मुलीच्या प्रियकराचा ‘गेम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2022 18:41 IST2022-01-10T18:35:49+5:302022-01-10T18:41:04+5:30
मुलीशी असलेले प्रेमसंबंध जर समाजात माहिती पडले, तर आपली बदनामी होईल, या भीतीने मुलीच्या बापाने तरुणाच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली.

...अन् वडिलानेच केला मुलीच्या प्रियकराचा ‘गेम’
वर्धा : समाजात बदनामी होईल, या भीतीने वडिलाने चक्क मुलीच्या प्रियकराच्या डोक्यावर काठीने जबर प्रहार करून त्याची हत्या केल्याची घटना पुलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या येसगाव येथे रविवारी रात्री उशिरा घडली. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती दिली.
अमोल बाळकृष्ण ताल्हण असे मृत युवकाचे नाव आहे. तर, नीळकंठ ठाकरे, रा. येसगाव (मुरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल ताल्हण याचे नीळकंठाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते. याची माहिती नीळकंठाला होती. आपल्या मुलीशी असलेले प्रेमसंबंध जर समाजात माहिती पडले, तर आपली बदनामी होईल, या भीतीने नीळकंठ याने अमोल याच्या डोक्यावर काठीने जबर मारहाण केली. जखमी अवस्थेत अमोल याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी नीळकंठ ठाकरे याला अटक केल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी यांनी पुलगाव येथे भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. पुढील तपास ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.