पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर

By Admin | Updated: June 21, 2017 00:45 IST2017-06-21T00:45:28+5:302017-06-21T00:45:28+5:30

यंदा पाऊस लवकर आणि दमदार येणार असल्याचा अंदाज हवामान खाते व तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

Farmers anxious with rain rush | पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर

पावसाच्या दडीने शेतकरी चिंतातूर

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : यंदा पाऊस लवकर आणि दमदार येणार असल्याचा अंदाज हवामान खाते व तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा होती; पण पावसाळा आणि खरीप हंगाम सुरू झाला असताना जिल्ह्यात पावसाचा पत्ताच नाही. मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावत यंदा चांगला पाऊस होईल, असे संकेत दिले; पण तसे झाले नाही. मृग नक्षत्रामध्ये पेरणी केल्यास उत्पादन चांगले होते, हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. मृग नक्षत्रामध्ये जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पाऊस झाल्याने पेरण्या आटोपल्या; पण १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पेरलेले बियाणे मातीमोल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओलावा असलेल्या जमिनीतील बियाण्यांना मोड येऊन ते सडले तर कोरडवाहू जमिनीतील बियाणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. परिणामी, शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र हीच स्थिती असल्याने सध्या शेतकरी चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे. पाऊस आल्यास पेरण्या काही प्रमाणात साध्य होतील, असे शेतकरी सांगत आहेत.

तळेगाव (श्या.पं.) : परिसरात १५ दिवसांपासून पूरेसा पाऊस नसल्याने शेतातील पेरण्यांची कामे खोळंबली आहेत. मे महिन्याच्या शेवटी सुमारे एक ते दीड तास पाऊस झाला होता. पावसाळी वातावरण तयार झाल्याने काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली. त्यानंतर परिसरातील आर्वी, आष्टी, अंतोरा भागात पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. आपल्याकडेही पाऊस येईलच, या आशेवर शेतकरी होते; पण १५ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी, पेरणी केलेल्या बियाण्यांचे अंकुर जळण्याच्या मार्गावर आहे. आकाशात पावसाचे ढग जमा होतात; पण पाऊस येत नाही. हिच स्थिती परिसरातील गावांत आहे. काही शेतकऱ्यांकडे ओलिताची सोय आहे; पण विजेचा लपंडाव सुरू आहे. देवगाव परिसरात तर विद्युत मंडळाच्या रोहित्रातून वारंवार आॅईल चोरीच्या घटना घडत आहे. यामुळे त्या भागातील वीज पुरवठा बंद होतो. परिणामी, शेतकरी त्रस्त आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनच्या कमी भावामुळे कपाशीचा पेरा वाढला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व कपाशीची लागवड केली; पण मृग नक्षत्र संपत असतानाही समाधानकारक पाऊस न आल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. सध्या तीन ते चार दिवसांपासून तळेगाव परिसरात उन्हाळ्यासारखीच स्थिती असून तापमान वाढत आहे.

पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांची उडाली झोप
चिकणी (जामणी) : मान्सूनपूर्व पावसामुळे सर्व शेतकरी कपाशीच्या लागवडीत व्यस्त झाले होते. मोठ्या प्रमाणात लागवडही झाली; पण मान्सूनच्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.
शेतकऱ्यांनी विकलेल्या तुरीचे चुकारे अद्याप मिळाले नसल्याने व जेम-तेम स्थिती असल्याने उधारी करून बी-बियाणे आणले व शेतात रूजविले; पण पाऊस येत नसल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र आहे. दुबार पेरणीची टांगती तलवार शेतकऱ्यांवर आहे. शासनाने घेतलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाचे शेतकऱ्यांनी स्वागत केले; पण निसर्ग साथ सोडत असल्याने शेतकऱ्यांचे दु:ख कमी होत नसल्याचेच दिसते. यावर्षी हवामान खात्याने वर्तविलेला पावसाचा अंदाज अद्याप तरी चुकीचा ठरत असल्याचे दिसते. पाऊस लवकर व समाधानकारक असल्याचे सांगण्यात आले होते. यानुसार शेतकऱ्यांनी लगबगीने कपाशीची लावण केली; पण पावसाने दडी मारल्याने रूजविलेले कपाशीचे बियाणे कोमेजले आहे. सूर्याच्या प्रखर उन्हामुळे ते करपत असल्याचे दिसते. दोन दिवसांत पाऊस न आल्यास दुबार पेरणीचे संकट अटळ आहे. ओलिताची सोय असलेले शेतकरी स्प्रिंकलरच्या साह्याने कपाशीचे अंकूर जगवित आहे.

बियाणे कोमेजण्याच्या मार्गावर
सेवाग्राम : लावणी, पेरणी झाली; पण पावसाने खो दिला. सूर्य तापू लागल्याने उगवलेले बियाणे कोमेजून मरण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी आतुरतेने पावसाची वाट पाहत आहे. सेवाग्राम ते हमदापूर परिसरात साधारण तीन वेळा पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी, तूर पिकांची लागवड केली. सोयाबीनचीही पेरणी आटोपली बहुसंख्य शेतात बियाणे उगवून जमिनीच्या वर कोंब निघाले आहे. जमिनीत ओलावा असल्याने बियाण्यांना पोषक वातावरण आहे; पण तीन दिवसांपासून उन्ह चांगलेच तापत आहे. वातावरणात उष्णता निर्माण झाली आहे. परिणाीम, ते जमिनीबाहेर आलेल्या अंकूरांना बाधक ठरत आहे. जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनाची व्यवस्था केली आहे; पण कोरडवाहू शेतकऱ्यांचे काय, हा प्रश्नच आहे. सध्या शेतकऱ्यांचे लक्ष पावसाकडे लागले आहे. शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा आहे. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास दुबार पेरणी मात्र अटळ दिसते.
 

Web Title: Farmers anxious with rain rush

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.